Facebook Instagram Whatsapp हे सोशल मीडिया ऍप्लिकेशन्स आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. आपल्या सर्वांना या सोशल मीडिया ऍप्लिकेशन्सची सवय लागली आहे असं म्हंटलं तर त्यात काही गैर ठरणार नाही. आपला दिवस WhatsApp मेसेजेसवरून सुरु होतो आणि फेसबुक आणि इंस्टावरील रिल्स पाहता पाहता संपतो. मात्र आता हेच इन्स्टा, WhatsApp आणि फेसबुक पैसे आकारणार असल्याचं समजतंय.
तुम्हाला ठाऊक असेलच की Facebook, Instagram आणि Whatsapp यांची मेटा (Meta) ही मुळ कंपनीआहे. याच मेटामध्ये एक नवा विभाग सुरु करण्यात आला आहे. हा नवा विभाग पेड फीचरवर काम करत असल्याच्या बातम्या आहेत. म्हणजेच भविष्यात तुम्हाला हे फीचर्स वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या विभागाच्या प्रमुख प्रतीती रॉय या असणार आहेत. प्रतीती रॉय यांनी याआधी मेटामध्ये हेड ऑफ रिसर्च म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
एका आंतरराष्ट्रीय टेक वेबसाईटच्या माहितीनुसार मेटाने एक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. या विभागाचं नाव न्यू मॉनेटायझेशन एक्सपीरियन्स (New Monetization Experiences) असं आहे. या विभागात Facebook, Instagram आणि Whatsapp यावरील पेड फीचर्सवर काम करण्यात येणार आहे.
ट्विटर, स्नॅपचॅट आणि मेटा या कंपन्यांच्या उत्पन्नाचा सर्वाधिक हिस्सा हा जाहिरातींमधून येतो. मात्र या नव्या विभागाच्या मदतीने कंपनीला जहिरातींशिवायही पैसे कमावण्याचं साधन मिळणार आहे. स्नॅपचॅट आणि ट्विटर या कंपन्यांनी या आधीच पेड फिचर द्यायला सुरुवात केली आहे.