काही हरवलेली कागदपत्रं अशी सहज मिळवा

कित्येकदा प्रयत्न करुनही कागदपत्रे पुन्हा मिळवताना खूप वेळ लागतो. 

Bollywood Life | Updated: May 3, 2019, 08:10 PM IST
काही हरवलेली कागदपत्रं अशी सहज मिळवा title=

मुंबई:  आपण आपले महत्वपूर्ण कागदपत्र नेहमीच सांभाळून ठेवत असतो, पण अनेक वेळा ते हरवतात. मात्र यातील काही कागदपत्र आपण सहज परत मिळवू शकतो. या कागदपत्रांमध्ये प्रॉपर्टी कागदपत्र, बॅंक पासबूक, इन्शुरन्स पॉलिसी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, म्युच्युअल फंड यांचा समावेश होतो. यापैकी काही हरवलं की मोठ्या अडचणी निर्माण होतात. कित्येकदा प्रयत्न करुनही कागदपत्रे पुन्हा मिळवताना खूप वेळ लागतो. 

तसेच कागदपत्रे परत मिळवण्याची योग्य प्रक्रिया माहित नसल्यामुळे अनेकांची गडबड होते. त्याचबरोबर पुन्हा कागदपत्रे तयार करण्यासाठी, नागरिकांकडून अधिक पैसे उकळले जातात. त्यामुळे अनेकजणं वैतागून जातात. 

पण कशाप्रकारे हरवलेली कागदपत्रे लवकरात मिळवता येतील, याची योग्य माहिती तुम्हाला असेल, तर तुम्ही ती कागदपत्र सहज मिळवू शकतात.

 

हरवलेली कागदपत्रे मिळवण्याची योग्य प्रक्रिया...

१) प्रॉपर्टी कागदपत्रे 

प्रॉपर्टीची कागदपत्र हरवली, तर पोलीस ठाण्यात याची तक्रार करणे गरजेचे आहे. त्यानंतर दोन महत्वाच्या वृत्तपत्रात याची जाहिरात द्यावी लागते. तक्राराची प्रत आणि वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीचे कटींग सब-रजिस्टर ऑफिसमध्ये जमा करा. 

रजिस्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर संबधित व्यक्तीला डुप्लिकेट पेपर मिळवण्याकरीता फी भरावी लागेल. रजिस्टर ऑफिसमधील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच डुप्लीकेट कॉपी मिळवता येते.

२) बॅंक पासबूक 

बॅंक पासबूक हरवल्यानंतर सर्वप्रथम बॅंकेला कळवा. डुप्लिकेट पासबुकसाठी बँकेकडे अर्ज करा. यामध्ये एक निश्चित स्वरूप आहे, ज्यामध्ये आपल्याला आपले खाते आणि वैयक्तिक माहिती देणे आवश्यक आहे. 

डुप्लिकेट पासबूक मिळवण्यासाठी, काही बँकांना एक ठराविक फी असते.  अशावेळी काही बँका डुप्लिकेट पासबूक बनवून देण्यासाठी एफआयआरची एक कॉपी मागतात. परंतू याची काही गरज नसते. त्यानंतर बँक आपल्याला डुप्लीकेट पासबुक देतात.

३)इन्शुरन्स पॉलिसी

इन्शुरन्स पॉलिसीची कॉपी मिळवण्याकरीता इन्शुरन्स कंपनीला अर्ज करणे गरजेचे आहे. पॉलिसी नंबर, पॉलिसी काढली ते ठिकाण, तारीख इत्यादी, कागदपत्रांच्या आधारावर विमा कंपनी डुप्लिकेट पेपर जारी करते.

४)नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) पेपर गहाळ झाल्यानंतर डुप्लिकेट पेपर प्राप्त करण्याची प्रक्रिया थोडी कठीण आहे. प्रथम आपल्याला पोलीस स्टेशनला तक्रार करावी लागेल. यानंतर स्टॅम्प पेपर तयार करावा लागेल, ज्यामध्ये कागदपत्राची संपूर्ण माहिती भरली जाईल. एक मराठी वृत्तपत्रात कागदपत्रे गहाळ झाल्याची जाहिरात करावी लागेल. मग आपल्याला एक हमीदार सादर करावा लागेल, जो आपल्याला ओळखतो. या सर्व प्रक्रियांचा अवलंब केल्यानंतर आपल्याला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट डुप्लिकेट मिळेल.

५) म्‍युचुअल फंड

म्‍युचुअल फंड डुप्लिकेट कॉपी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे अर्ज करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर, एएमसी आपल्याला बँक तपशील, वैयक्तिक माहिती गुंतवणूक खाते क्रमांक विचारेल. पॅनकार्डची एक कॉपी सादर करणे आवश्यक आहे. या एएमसी नंतर तुम्हाला कागदपत्रे मिळेल. तसेच, दस्तऐवजाची एक प्रत आपल्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठविली जाईल.

६) वरील काही बाबतीत त्या संस्थेनुसार कमीत कमी पुरावे सादर केल्यानंतरही संबंधित कागदपत्र तुम्हाला मिळू शकतात.