मुंबई : मोबाईल इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं प्राईज वॉर आणखीनच तीव्र होत चाललं आहे. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता आणखी एक कंपनी बाजारत उतरली आहे. ही कंपनी १७ रुपयांमध्ये महिन्याला इंटरनेट डेटा देणार आहे.
कॅनडाची मोबाईल हँडसेट कंपनी डेटाविंड ग्राहकांना २०० रुपयांमध्ये वर्षभरासाठी म्हणजेच महिन्याला जवळपास १७ रुपयांमध्ये इंटरनेट डेटा प्लॅन देण्याची योजना बनवत आहे. यासाठी डेटाविंड दूरसंचार व्यवसायामध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. लायसन्स मिळाल्यावर पहिल्या सहा महिन्यांमध्ये डेटाविंड ही गुंतवणूक करणार आहे.
स्वस्तामध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेट विकणाऱ्या डेटाविंड कंपनीनं दूरसंचार सेवा पुरवण्यासाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. हे लायसन्स मिळाल्यावर कंपनी मोबाईल इंटरनेट सेवा द्यायला सुरुवात करणार आहे.
एका महिन्यामध्ये आम्हाला लायसन्स मिळण्याची शक्यता आहे. यानंतर लवकरच डेटाविंड सेवा द्यायला सुरुवात करेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष सुनीतसिंह तुली यांनी दिली आहे. आम्ही इंटरनेट सेवा देण्यासाठी महिन्याला २० रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे घेऊ असं तुली म्हणालेत.
रिलायन्स जिओचा ३०० रुपयांचा प्लॅन हा महिन्याला एक ते दीड हजार रुपये खर्च करणाऱ्यांसाठी आहे. अशा ग्राहकांची संख्या फक्त ३० कोटी आहे. उरलेले ग्राहक महिन्याला फक्त ९० रुपयेच खर्च करतात, या ग्राहकांसाठी जिओची ऑफर स्वस्त नसल्याचा दावा तुलींनी केला आहे.