मुंबई: लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता अनेक जण डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. याच सोबत एक भलीमोठी समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणात हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे.
तुमच्याकडे जर BSNL चं सिमकार्ड असेल तुम्ही जर या कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे तुमचं KYC करायचं असल्याचं सांगून मोठी फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीएसएनएल धारकांना एक मेसेज येत आहे. या मेसेजवर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. या क्रमांकावरून एक SMS येत आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, तुमचं KYC पेडिंग आहे. तुम्ही तुमचं KYC पूर्ण केलं नाही तर पुढच्या 24 तासात SIM ब्लॉक होईल.
SIM ब्लॉक होऊ नये आणि केवायसी व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी 8926059720 या क्रमांकावर संपर्क करा असं या SMS मध्ये सांगण्यात आलं आहे. हा क्रमांक चुकीचा असून लोकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.
अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजला बळी पडू नका. तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन जर खरंच पूर्ण करायचं बाकी असेल तर SIM ज्या कंपनीचं आहे तिथे जाऊन चौकशी करा. अशा प्रकारच्या मेसेजला बळी पडणं म्हणजे स्वत: फसवणूक करणाऱ्या हॅकर्सच्या हातात आपलं कोलित देण्यासारखं आहे. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध आणि सतर्क राहा.