Girl Swallowed Mobile: ...म्हणून तिने मोबाईलच गिळला! डॉक्टरही झाले थक्क

Angry Girl Swallowed Mobile: या मुलीने रागाच्याभरात हा मोबाईल गिळल्यानंतर तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. पोटातील वेदनांमुळे ती विव्हळत असल्याने नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

Updated: Apr 6, 2023, 07:13 PM IST
Girl Swallowed Mobile: ...म्हणून तिने मोबाईलच गिळला! डॉक्टरही झाले थक्क title=
Girl Swallowed Mobile

Girl Swallowed Mobile: लहान मुलांच्या नाकात किंवा तोंडात सिक्का अथवा एखादी गोष्ट अडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतली. काही घटनांमध्ये वेळीच उपचार मिळाल्याने अशा मुलांचे प्राण वाचतातही. मात्र आतापर्यंत नाणी, बॉल पेन यासारख्या वस्तू मुलांनी गिळलेल्या तुम्ही ऐकलं असलं तरी मध्य प्रदेशमध्ये एका मुलीने चक्क मोबाईल गिळल्याची घटना समोर आली आहे. येथील भिंड जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला. मुलीने मोबाईल गिळल्याचं समजल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने तिला भिंड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र प्रकरणाचं गांभीर्य पाहता या मुलीला ग्वालियरमधील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. या ठिकाणी डॉक्टरांनी या मुलीची शस्त्रक्रीया करुन तिच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला.

पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला

ग्वालियरमधील जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक असलेल्या आर. के. धाकड यांनी या प्रकरणासंदर्भातील माहिती दिली. पहिल्यांदा या मुलीला घेऊन तिचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते. तिला रुग्णालयात आणलं तेव्हा मोबाईल तिच्या घशातून खाली सरकून पोटात गेला होता. अशाप्रकारे एवढ्या मोठ्या आकाराची गोष्ट गळ्यामधून पोटापर्यंत जाण्याची पहिलीच केस आपण पाहत असल्याचं डॉक्टर धाकड यांनी सांगितलं.

शस्त्रक्रीया केल्यानंतर पोटदुखी थांबली

मोबाईलसारखी मोठ्या आकाराची गोष्ट पोटात गेल्याने या मुलीला फार वेदना होत होत्या. त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी अल्ट्रासाऊंड चाचणीनंतर मोबाईल या मुलीच्या पोटात नेमका कुठे आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती डॉक्टरांना मिळाली. त्यानंतर या रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या एका टीमने या मुलीवर शस्त्रक्रीया केली. डॉक्टरांनी या मुलीच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला. मोबाईल बाहेर काढण्यात आल्यानंतर या मुलीच्या पोटात दुखायचं थांबलं.

का गिळलेला मोबाईल?

समोर आलेल्या माहितीनुसार आपल्या भावाबरोबर मोबाईल फोनच्या मुद्द्यावरुन या मुलीचं भांडण झालं होतं. यानंतर मुलीने रागाच्याभरात हा मोबाईल तोंडात टाकला आणि तो गिळला. त्यानंतर तिच्या पोटात फार दुखू लागलं. ती वेदनांनी विव्हळत असल्याचं पाहून तिला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं. वेळीच उपचार मिळाल्याने या तरुणीचा जीव वाचला. मात्र मोबाईल तिच्या घशातून अन्ननलिकेमध्ये आणि तिथून पोटापर्यंत नेमका कसा गेला हे कोडं डॉक्टरांनाही उलगडलेलं नाही. अशाप्रकारचं हे पहिलंच प्रकरण आम्ही हाताळल्याचं डॉक्टरांनीही म्हटलं आहे. गावामध्येही हा विचित्र प्रकरणाची जोरदार चर्चा असली तरी या मुलीचा जीव वाचल्याचं सर्वांनाच समाधान आहे असं गावकरी सांगतात.