Aeroplane secret room : विमानानं प्रवास करत असताना तिकीट काढण्यापासून संपूर्ण प्रवास आणि त्यानंतर अगदी अपेक्षित स्थळी पोहोचून विमानातून बाहेर पडण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण अदगी खास असतो. जी मंडळी पहिल्यांदाच विमान प्रवासासाठी निघतात, त्यांच्यासाठी तर हा अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका कमाल असतो. विमान प्रवास पहिला असो वा सराईताप्रमाणं केला जाणारा, या प्रवासामध्ये प्रवासी लहानमोठ्या गोष्टींचं निरीक्षण करत असतात.
एअर हॉस्टेस किंवा क्रू मेंबर्सच्या वर्तणुकीपासून अगदी विमानाच्या सीट आणि इतर कैक बारकावे प्रवासी टीपतात. या निरीक्षणक्षमतेची दाद द्यावी तितकी कमीच. पण, या प्रवाशांच्या नजरेतून एक बाब मात्र निसटते. कोणती माहितीये? ही बाब म्हणजे विमानातील एक सिक्रेट रुम, अर्थात काहीशी रहस्यमयी खोली.
विमानानं प्रवास करताना एक बाब तुमच्या लक्षात आली असेल, की एअर हॉस्टेर पूर्ण प्रवासादरम्यान उभ्या नसतात. एकतर त्या प्रसाधनग-हापाशी असणाऱ्या आसनावर बसतात किंवा कॉकपीटमध्येही जातना दिसतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, विमानात केबिन क्रू मेंबर्स लांब प्रवासामध्ये आराम कधी करतात?
सीएनएनच्या वृत्तानुसार ज्यावेळी विमान एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघतं, तेव्हा विमानातील एअर हॉस्टेर आणि क्रू मेंबर्सना आराम करण्यासाठीचाही वेळ दिला जातो. किंबहुना त्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली असते. ही व्यवस्था म्हणजे सिक्रेट रुमची.
विमानात असणारे आणि सहसा कोणाच्याही नजरेस न पडणारे हे रूम या मंडळींसाठी राखीव असून, तिथं त्यांना आराम करू दिला जातो. सामान्य प्रवाशांना हे रुम जिथं असतात त्या विभागात प्रवेश दिला जात नाही, त्यामुळं प्रवाशांना सहजासहजी हे रुम दिसतच नाहीत. वैमानिक आणि एअर हॉस्टेसना आराम करण्यासाठीच्या सुविधा या रुममध्ये दिल्या जातात. बिछाना, चादर, लाईट आणि एसी अशा सुविधा या छोटेखानी खोलीमध्ये असतात.
नव्या शैलीच्या विमानांमध्ये हे रुम मुख्य केबिनच्या वरच्या भागात असतात. तर, जुन्या बनावटीच्या विमानांमध्ये ते कॉकपिटशेजारी असतात. आहे की नाही कमाल गोष्ट?