बर्मिंघम : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा २२४ रनवर ऑल आऊट केला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय ऑस्ट्रेलियाला चांगलाच महागात पडला. ऑस्ट्रेलियाची अवस्था १४/३ अशी झाली होती. कर्णधार एरॉन फिंच पहिल्याच बॉलला तर डेव्हिड वॉर्नर ९ रनवर आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब ४ रनवर आऊट झाले होते. पण यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ऍलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाची इनिंग सांभाळली.
स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ८५ रन केले, तर ऍलेक्स कॅरी ४६ रन करून माघारी परतला. जॉस बटलरने स्टीव्ह स्मिथला रन आऊट घेतलं. ग्लेन मॅक्सवेलने २२ रन करून आणि मिचेल स्टार्कने २९ रन करून स्मिथला मदत केली. पण ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.
इंग्लंडकडून क्रिस वोक्स आणि आदिल रशीदने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या, तर जोफ्रा आर्चरला २ विकेट घेण्यात यश आलं. मार्क वूडला १ विकेट मिळाली. वोक्सने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले आणि यातून ऑस्ट्रेलिया सावरू शकली नाही.