दोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची

'प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता'

Updated: Aug 30, 2018, 04:30 PM IST
दोन्ही पायांना सहा बोटं... स्वप्नाला गरज खास बुटांची  title=

कोलकाता : जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये महिला खेळाडू स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदकावर कब्जा मिळवला... स्वप्नानं सात इव्हेंटमध्ये एकूण 6026 अंकांसोबत पहिलं स्थान मिळवलं. स्वप्नानं उंच उडी (1003 अंक), भाला फेक (872 अंक) मध्ये पहिला तसंच गोळा फेक (707 अंक) आणि लांब उडी (865 अंक) दुसरा क्रमांक मिळवला. अतिशय गरिब परिस्थितीतून आलेल्या स्वप्नावर एक वेळ अशीही आली होती जिथे चांगले स्पोर्टस शूज घेण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला... स्वप्नाच्या दोन्ही पायांना सहा बोटं आहेत. पायाची रुंदी जास्त असल्या कारणानं खेळांदरम्यान स्वप्नाच्या अडचणी वाढत होत्या. या कारणानं तिचे बूट दीर्घकाळ टीकतदेखील नाहीत. 

यावर बोलताना, 'मी इतर लोक वापरतात ते सामान्य बूट परिधान करते. प्रॅक्टीस दरम्यान या बुटांचा त्रास होत होता' असं स्वप्नानं म्हटलंय. यावर, एखाद्या कंपनीनं तुझ्यासाठी खास बूट बनवावेत असं वाटतं का? असा प्रश्न तिला विचारला तेव्हा... 'निश्चितच, त्यामुळे माझ्यासाठी सोपं होईल' असं स्वप्नानं म्हटलंय. 

या खेळादरम्यान स्वप्नानं तिच्या गालावर एक पट्टी लावली होती... त्याबद्दल विचारल्यावर तिनं आपल्याला दातदुखीचा दोन दिवसांपासून त्रास होत असल्याचंही सांगितलं... त्रास वाढत होता, पण मेहनत वाया जाऊ नये, अशीही इच्छा होती... त्यामुळे दातदुखी विसरून मी खेळले, असं स्वप्नानं म्हटलंय.  

एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी स्वप्ना पहिला महिला खेळाडू आहे. उत्तर बंगाच्या जलपाईगुडी शहारच्या एक झोपडीवजा घरात राहणाऱ्या या कुटुंबातील एका मुलीनं ही कामगिरी करून दाखवलीय. स्वप्नाचे वडील पंचन बर्मन रिक्षा चालवतात... परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी अंथरुण धरलंय. 'आम्ही कधीही स्वप्नाच्या गरजा पूर्ण करू शकलो नाही... परंतु, तिनं मात्र कधीही याबद्दल तक्रार केली नाही' असं स्वप्नाच्या आईनं भावूक होत म्हटलं.