WPL 2023: संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेल्या महिला प्रीमियर लीगला (Women Premiere League) अखेर सुरुवात झाली आहे. प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स आपापसात भिडले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने तब्बल 143 धावांनी गुजरात जायंट्सचा पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली आहे. दरम्यान पहिल्या सामन्यासह वादालाही सुरुवात झाली आहे. या वादामुळे गुजरात जायंट्सवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.
वेस्ट इंडिजची खेळाडू डिएंड्रा डॉटिनला गुजरात जायंट्सने 60 लाख रुपयात खरेदी केलं होतं. पण डिएंड्रा या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही. स्पर्धा सुरु होण्याच्या काही वेळ आधीच डिएंड्राच्या जागी दुसऱ्या एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आलं. दरम्यान, गुजरात जायंट्सने डिएंड्रा डॉटीन फिट नसून ती स्पर्धेत खेळू शकत नाही अश माहिती दिली आणि यानंतरच वादाला तोंड फुटलं.
गुजरात जायंट्सच्या दाव्यावर स्वत: डिएंड्रा डॉटीनने प्रश्न उपस्थित केला. आपण पूर्णपणे फिट आहोत असं ट्वीट डिएंड्रा डॉटीनने केलं आणि एकच चर्चा सुरु झाली. तसंच कोणावरही विश्वास ठेवू नका असं आवाहनही तिने केलं. 'माझ्याकडे जे संदेश येत आहेत, त्यासाठी धन्यवाद. पण सत्य वेगळं आहे,' असं ट्वीट डिएंड्रा डॉटीनने केलं.
I really appreciate all the messages but truth be told I’m recovering from nothing but the Holy Ghost anointing thank you #GodIsGood #GodIsInControl
— Deandra Dottin (@Dottin_5) March 4, 2023
डिएंड्रा डॉटीनच्या ट्वीटनंतर वाद वाढू लागला आणि गुजरात जायंट्सवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. गुजरात जायंट्सने ट्वीट करत डिएंड्रा डॉटीन एक सर्वोत्तम खेळाडू असून, संघासाठी फार महत्त्वाची असल्याचं सांगितलं. डिएंड्रा डॉटीनला वेळेवर वैद्यकीय मंजुरी मिळाली नव्हती. महिला प्रिमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी ही मंजुरी आवश्यक आहे असा दावा गुजरात जायंट्सने केला आहे. दरम्यान आगामी स्पर्धेत डिएंड्रा डॉटीन संघासह असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
Our statement.#TATAWPL #BringItOn #GujaratGiants #WPL2023 pic.twitter.com/G5x61FOKBW
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 5, 2023
नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडिअमवर महिला प्रिमियर लीगचा पहिला सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी दारुण पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 65 धावांची स्फोटक खेळी केली. तर सायना इशकने 11 चेंडूत 4 गडी बाद करत भेदक गोलंदाजी केली.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 207 धावा केल्या होत्या. गुजरात जायंट्स मात्र पूर्ण 20 ओव्हर्सही खेळू शकला नाही. गुजरातची स्थिती 15 ओव्हर्समध्ये 65 धावांवर 9 बाद अशी झाली होती.