मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. सध्या वनडे मालिका सुरु असून टीमची कामगिरी खूप लाजिरवाणी होती. पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीमने आता मालिकाही 2-0 ने गमावली आहे. संघात अनेक दिग्गज खेळाडू असूनही विजय मिळवता आला. मात्र 2 अनुभवी क्रिकेटपटूंच्या पुनरागमनामुळे अशा अडचणींवर मात करता येईल, असा सल्ला दिनेश कार्तिकने दिला आहे.
मिडिल ऑर्डर टीम इंडियाची अडचण आहे. यामध्ये श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर, ज्यांच्याकडून मॅनेजमेंटला मोठ्या आशा होत्या त्यांनी निराश केलं. टीममध्ये रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंची नितांत गरज आहे. यामुळे टीममध्ये मोठा फरक पडेल, असं दिनेश कार्तिकचं मत आहे.
एका वेबसाईटशी बोलताना दिनेश कार्तिकने सांगितलं की, "मला वाटतं की टीमला दोन महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासतेय. त्यांचं टीमतील महत्त्व मोलाचं आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा जेव्हा येतील तेव्हा टीमची परिस्थिती वेगळी असेल. सहाव्या क्रमांकावर हार्दिक आणि जडेजा पूर्णपणे वेगळे असतील."
रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. जडेजा फीट झाल्यानंतर टीममध्ये कमबॅक करू शकतो. परंतू हार्दिक पांड्याचा टीममध्ये समावेश केला तर तो गोलंदाजी करू शकत नाही.