पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'

Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Mar 31, 2024, 03:53 PM IST
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी' title=
PCB appointed Babar Azam As Captain

PCB appointed Babar Azam As Captain : वनडे वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून आलं. वर्ल्ड कपच्या पराभवाचं खापर फोडत बाबर आझमकडून (Babar Azam) कॅप्टन्सी काढून घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देखील सततच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) तोंडावर पडलं आहे. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा बाबर आझमकडे कॅप्टन्सी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला (Shaheen Shah Afridi) टी-20 कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील सदस्य यांना शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या कॅप्टन्सीवर शंका उपस्थित केली होती. पीसीबीचे सदस्य या दोघांच्या कामगिरीवर खूप निराश होते. शान आणि शाहिन यांच्या कॅप्टन्सीखाली पाकिस्तान टीमने खूप खराब प्रदर्शन केल्याने पीसीबीने पुन्हा यु-टर्न घेतल्याचं पहायला मिळतंय.

बाबर आझमवर पुन्हा विश्वास का?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या सर्वानुमते शिफारशीनंतर, PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बाबर आझमची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती पीसीबीच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. मात्र, बाबर आझमवर पुन्हा विश्वास का दाखवला जातोय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. शाहीनला विश्वासात न घेता बाबरची नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रीय संघातील एकतेवर परिणाम करू शकतो, असंही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या काही सदस्यांना वाटत आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेटसाठी त्याचं योगदान आणि पुन्हा नव्याने संघ तयार करण्याची त्याची कला, यासाठी बाबरला पुन्हा कॅप्टन केल्याची माहिती पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिली आहे.

गेल्या वर्षी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर बाबरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पदावरून पायउतार झाला होता. त्यानंतर त्याला पुन्हा कॅप्टन करताना त्याने काही अटी शर्ती ठेवल्या होत्या. बाबरने कर्णधार म्हणून सर्वोच्च अधिकार मागितले होते. किमान दोन वर्षे हॉट सीट (कर्णधारपद) मिळावं, अशी मागणी त्याने केली होती. तसेच आगामी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाच्या कामगिरीसाठी त्याला जबाबदार धरू नये, अशी अट देखील बाबरने ठेवल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या प्रशिक्षकाविना असलेला पाकिस्तान संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय घरच्या मालिकेच्या तयारीसाठी पाकिस्तान मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण शिबिर घेत आहे.