Arjun Tendulkar Century Celebration : जगभरात क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव असलेल्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) वारसा आता अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) पुढे चालवताना दिसतोय. अर्जुनने क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नेहमीच वडिलांच्या खेळाचा दर्जा आणि रेकॉर्डखाली दबलेल्या या युवा खेळाडूने आता स्वत:च्या हिमतीवर नवा विक्रम केलाय. त्याच्या आजच्या या विक्रमामुळे तो त्याच्या वडिलांच्या बरोबरीने आला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना शतक पूर्ण केले. गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकरनेही रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 1988 मध्ये पदार्पणातच शकत ठोकले होते. आता या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी अर्जुन तेंडुलकरकडे आहे.
अर्जुन तेंडुलकरने त्याच्या शतकासोबत आनंद साजरा करण्याच्या पद्धतीकडेही सर्वांचं लक्ष खेचून घेतलं. अर्जुनने सिंगल रन घेत स्वतःच शतक पूर्ण केलं. शतक पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा त्याने हेल्मेट काढलं आणि हवेत बॅट फिरवली. याशिवाय त्याने अगदी वडिलांप्रमाणे आकाशाकडे पाहिलं आणि शतकाचा आनंद साजरा केला.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अगदी याच पद्धतीने सचिन तेंडुलकर देखील शतक मारल्यानंतर आनंद साजरा करायचा. अर्जुनच्या या सेलेब्रेशनमध्ये एक आकर्षक गोष्ट दिसली ती, म्हणजे, त्याने आपल्या इतर सहकारी खेळाडूंकडे नतमस्तर होत त्यांना सलाम केला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा येथे प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याने राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत शतक ठोकलं आहे.