मुंबई : भारताचे सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी टी -20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षकपद सोडतील. वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे. दरम्यान टीमचा नवा कोच कोण असणार याची सर्वांना उत्सुकता आहे. या महिन्यात बीसीसीआय टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाला अंतिम रूप देण्याची प्रक्रिया सुरू करेल.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीप्रमाणे, आम्ही या आठवड्याच्या अखेरीस नवीन प्रशिक्षकासाठी जाहिरात जारी करावी. टीम इंडियाच्या कोचची संबंधित अटी आणि आवश्यक पात्रता आम्ही आधीच ठरवल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड मालिकेपूर्वी आमच्याकडे नवीन प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी असतील.
रवी शास्त्रींनी स्वतः बीसीसीआयला कळवलं आहे की, ते पुन्हा या कोचसाठी पुन्हा अर्ज करणार नाहीत. अशा स्थितीत त्यांच्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक माजी भारतीय आणि परदेशी खेळाडू या शर्यतीत सहभागी आहेत.
बीसीसीआयचे काही सदस्य अनिल कुंबळे यांच्या संपर्कात होते. त्यांनी पुन्हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा, अशी त्यांची इच्छा होती. तर दुसरीकडे या पदासाठी राहुल द्रविड याचं नावंही चर्चेत आहे. मात्र राहुल द्रविड हे पद सांभाळण्यासाठी इच्छुक नसल्याचं समोर आलं आहे.
कुंबळे आणि द्रविडप्रमाणे व्हीव्हीएस लक्ष्मणचं नावंही या स्पर्धेत पुढे आहे. याशिवाय टॉम मूडी यांच्या नावाचा देखील विचार करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.