पुणे : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईच्या शेन वॉटसननं शतक झळकावलं आहे. या शतकाच्या जोरावर चेन्नईनं राजस्थानपुढे २०५ रनचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईनं २० ओव्हरमध्ये २०४/५ एवढा स्कोअर केला. वॉटसननं ५७ बॉलमध्ये १०६ रन्सची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ९ फोरचा समावेश होता. सुरेश रैनानं २९ बॉलमध्ये ४६ आणि ड्वॅन ब्राव्होनं १६ बॉलमध्ये नाबाद २४ रन केल्या. राजस्थानच्या श्रेयस गोपाळला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या तर बेन लाफलिनला २ विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये राजस्थाननं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता.
आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही मोसमांमध्ये वॉटसन राजस्थानकडून खेळला होता. तेव्हा त्यानं चेन्नईविरुद्ध शतक केलं होतं आणि आता चेन्नईकडून खेळताना त्यानं राजस्थानविरुद्ध शतक केलं. असं रेकॉर्ड करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. वॉटसनचं आयपीएलमधलं हे तिसरं शतक आहे. यंदाच्या आयपीएलमधलं हे दुसरं शतक आहे. कालच झालेल्या मॅचमध्ये पंजाबच्या क्रिस गेलनं हैदराबादविरुद्ध शतक केलं होतं.