नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकणारा संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर एकवर पोहोचला आहे. कोहलीला अलीकडेच डीव्हिलियर्सने मागे टाकलं होतं. याशिवाय कोहलीने आपल्या करिअरचे सर्वोच्च रेटिंग देखील प्राप्त केले आहे.
कोहलीकडे एकूण 889 रेटिंग गुण असून यापेक्षा कुठल्याही भारतीय फलंदाजाने सर्वाधिक गुण मिळविले आहेत. 1998 मध्ये सचिन तेंडुलकरने 887 गुण मिळवले होते.
कानपूर वनडेमध्ये रोहित शर्माने देखील 147 धावा केल्या. त्याचे रेंटींग पॉइंट 799 झाले असून तो सातव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीने देखील एक स्थान वरचं गाठलं आहे. तो आता 11 व्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा हसन अली पहिल्या नंबरवर आहे. तसेच जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 6 बळी घेतल्याने तिसरं स्थान पटकावलं आहे.