दिल्ली : टी-20 नंतर आता टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध टेस्ट सामन्यांची सिरीज खेळणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंनीही तयारीला सुरुवात केली आहे. तर माजी कर्णधार विराट कोहलीची ही 100 टेस्ट असणार आहे. ही टेस्ट विराटसाठी खास असून विराटने आता नेट प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे. रविवारच्या दिवशी कोहलीने मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये 2 तास सराव केला.
विराट कोहलीसोबत ऋषभ पंत देखील सराव करण्यासाठी उपस्थित होता. दरम्यान विराट कोहली प्रॅक्टिस करत असताना गेटच्या बाहेर कोहलीचे काही चाहते पोहोचले होते. विराटला पाहतातच फॅन्स त्याच्या नावाने ओरडू लागले. यामुळे विराट लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. आणि या चाहत्यांची तक्रार विराटने सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे केली.
यानंतर सुरक्षा रक्षकांनी गेटजवळ उभ्या असलेल्या फॅन्सना माघारी पाठवून दिलं. आपल्या आवडीच्या खेळाडूला पाहण्यासाठी चाहते नेहमीच गर्दी करतात. मात्र सध्या बायो बबलचे नियम इतके कठोर आहेत की कोणीही खेळाडूच्या जवळ पोहोचू शकत नाही.
प्रॅक्टिस सेशन दरम्यान विराटने फलंदाजीसोबत थ्रो बॉल शॉट्सचाही अभ्यास केला. तर ऋषभ पंतने स्थानिक गोलंदाजांसोबत मोठ्या आणि लांब शॉट्सची प्रॅक्टिस केली.
2015 मध्ये विराटने टेस्ट टीमचं कर्णधारपद स्विकारलं होतं. त्यामुळे आता तब्बल 7 वर्षांनंतर विराट कोहली टीममधील एक खेळाडू किंवा सदस्य म्हणून मैदानावर उतरणार आहे.