तिरुवनंतपुरम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे वेस्ट इंडिजने ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये पुनरागमन केलं आहे. आता १-१ने बरोबरीत असलेल्या सीरिजचा निकाल बुधवारी तिसऱ्या टी-२०मध्ये लागणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच खेळवण्यात येणार आहे.
दुसऱ्या टी-२०मध्ये विराट कोहली तिरुवनंतपुरमच्या स्टेडियममधल्या प्रेक्षकांवर भडकल्याचं पाहायला मिळालं. विकेट कीपर असलेला ऋषभ पंत स्टम्पच्या मागे अपयशी ठरल्यानंतर प्रेक्षकांमधून धोनी-धोनी अशा घोषणा देण्यात आल्या. ही घोषणाबाजी सुरु असताना विराट सीमारेषेवर फिल्डिंगला उभा होता. यावेळी विराटने प्रेक्षकांना शांत बसायला सांगितलं.
Virat Kohli's reaction when crowd were booing Rishabh Pant. pic.twitter.com/TVpzHWoqaB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2019
५व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर पंतने एव्हिन लुईसचा कॅच सोडला. यानंतर प्रेक्षकांमधून धोनीच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात झाली. त्याआधी संजू सॅमसनला पाहूनही प्रेक्षकांनी जल्लोष केला, पण संजू सॅमसनला विराटने संधी दिली नाही. संजू सॅमसनचं हे घरचं मैदान होतं, त्यामुळे त्याला पाहून प्रेक्षकांनी जल्लोष केला.
ऋषभ पंतला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक स्टेडियममध्ये पंत आला की धोनीच्या नावाची घोषणा व्हायची. विराटने याआधीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारे धोनीचं नाव घेऊन पंत सारख्या युवा खेळाडूवर दबाव आणू नका, असं आवाहन विराटने प्रेक्षकांना केलं होतं.
एव्हिन लुईसचा कॅच सोडल्यानंतर ऋषभ पंतनेच वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर लुईसला स्टम्पिंग केलं. एव्हिन लुईस ४० रन करुन माघारी परतला.