RCB Women Win WPL 2024 Title : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने वुमेन्स प्रिमियर लीगच्या (WPL 2024) दुसऱ्या हंगामात ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आरसीबी फ्रँचायझीने 16 वर्षानंतर ट्रॉफी उचलली. आयपीएलच्या 16 सिझनमध्ये विराट कोहली आरसीबीसाठी जे करू शकला नाही ते स्मृती मानधानाने दुसऱ्याच सिझनमध्ये करून दाखवलं. त्यामुळे आता विराट अँड कंपनी सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आरसीबीवर मीम्सचा बाजार उठवलाय. अशातच आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा माजी मालक आणि भारतातून अब्जावधींचे कर्ज घेऊन फरार घोषित झालेल्या विजय माल्याने (Vijay Mallya) ट्विट करत आरसीबीच्या महिला ब्रिगेडचं (RCB Women) कौतूक निर्माण केलंय.
काय म्हणतो विजय माल्या?
वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल आरसीबी महिला संघाचे हार्दिक अभिनंदन... आता आरसीबीच्या पुरूष संघाने आयपीएल जिंकल्यास ही एक विलक्षण दुहेरी आनंदाची बाब असेल, असं म्हणत विजय माल्याने विराट अँड कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे महिला संघावर अभिनंदनाचा वर्षाव करत विजय माल्याने पुरूष संघाला टोमणा मारलाय का? असा सवाल विचारला जात आहे.
Heartiest congratulations to the RCB Women’s Team for winning the WPL. It would be a fantastic double if the RCB Men’s Team won the IPL which is long overdue. Good Luck.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 17, 2024
काय म्हणाली स्मृती मानधना?
माझ्यासाठी याठिकाणी व्यक्त होणं खरोखर कठीण आहे. मी एक गोष्ट सांगेन की मला टीमचा अभिमान आहे. आमची टीम खरोखर उत्तम होती. आम्ही दिल्लीत आलो आणि आम्हाला दोनदा पराभव पत्करावा लागला. मात्र, आम्ही आमच्या कमजोर बाजूवर काम केलं अन् आज आम्ही जिंकलो. आमच्या संघात खूप उत्सुकता नव्हती, सर्वांना माहित होतं की आपलं काम आपल्याला करायचंय. मात्र, सर्वांनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. एक विधान नेहमी समोर येतं ते म्हणजे 'ई साला कप नमदे'. आता हा 'ई साला कप नामदू' आहे, असं स्मृती म्हणते.
आरसीबी झाली मालामाल (WPL Prize Money)
वुमेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात विजय मिळवल्यानंतर आरसीबीला 6 कोटी रूपयांचं बक्षीस मिळालं आहे. याशिवाय दिल्लीच्या टीमला 3 कोटी रूपये मिळाले आहेत. आरसीबीच्या श्रेयंका पाटिलला पर्पल कॅप आणि एलिस पेरीला ऑरेंज कॅप मिळाली. यावेळी दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळाले. याशिवाय यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू ठरली. तिला पाच लाख रुपये मिळाले. श्रेयंकाला इमर्जिंग प्लेयरचा पुरस्कारही मिळाला. त्यासाठी तिला 5 लाख रुपये मिळाले.