शारजाह : टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा मुकाबला पखतून्सशी होणार आहे. या दोन्ही टीम टी-१० सुपर लीगच्या पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर होत्या. या दोन्ही टीमनी क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२ मॅच खेळल्या. या मॅचमध्ये पखतून्सनी नॉर्थन वॉरियर्सचा पराभव केला होता. शनिवारी नॉर्थन वॉरियर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये शाहिद आफ्रिदीनं १७ बॉलमध्ये ५९ रनची खेळी केली होती. आफ्रिदीच्या या खेळीमुळे पखतून्सची टीम टी-१० क्रिकेट लीगच्या फायनलमध्ये पोहोचली.
आफ्रिदीनं त्याच्या खेळीमध्ये ७ सिक्स आणि ३ फोर मारले. १७ बॉलच्या या खेळीत आफ्रिदीनं १० बाऊंड्री मारल्या. दोन्ही टीममध्ये झालेल्या क्वालिफायर फायनल मुकाबल्यात पखतून्सनं नॉर्थन वॉरियर्सचा १३ रननी पराभव केला होता. पखतून्सनी या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करून १० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १३५ रन केले होते. याबदल्यात नॉर्थन वॉरियर्सनंही जलद रन केले पण त्यांना १२२ रनपर्यंतच मजल मारता आली.
नॉर्थन वॉरियर्सचा कर्णधार डॅरेन सॅमीनं टॉस जिंकून पहिले पखतून्सला बॅटिंगला बोलावलं. पखतून्सची सुरुवात खराब झाली आणि इनिंगच्या दुसऱ्याच ओव्हरला कॅमरून डेलपोर्टला ५ रनवर आंद्रे रसेलनं बोल्ड केलं. त्यावेळी पखतून्सचा स्कोअर फक्त ९ रन होता. यानंतर आंद्रे फ्लेचर आणि शफीकुल्लाह शफीकनं स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न केला. पण फ्लेचर १४ रनवर आऊट झाला. पखतून्सचा स्कोअर ५७ रनवर ४ विकेट झाला असताना कर्णधार आफ्रिदी बॅटिंगला आला आणि त्यानं फटकेबाजीला सुरुवात केली. तुफान बॅटिंग करत आफ्रिदीनं १७ बॉलमध्ये ५९ रन केले आणि पखतून्सचा स्कोअर १३५ पर्यंत पोहोचवला. आफ्रिदीनं लियाम डोसान(१५रन) सोबत पाचव्या विकेटसाठी ५७ रनची पार्टनरशीप केली.
१३६ रनचा पाठलाग करताना नॉर्थन वॉरियर्सला १० ओव्हरमध्ये १२२ रनच बनवता आल्या. नॉर्थन वॉरियर्सकडून रोवमॅन पॉवेलनं ३५ बॉलमध्ये ८० रनची खेळी केली यामध्ये ४ फोर आणि ९ सिक्सचा समावेश होता.
एलिमिनेटर मॅचमध्ये मराठा अरेबियन्सचा पराभव करत नॉर्थन वॉरियर्सनं दिमाखात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. एलिमिनेटर मॅचमध्ये नॉर्थन वॉरियर्सचा १० विकेटनं विजय झाला. या मॅचमध्ये मराठा वॉरियर्सनी १० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून ७८ रन केले. नॉर्थन वॉरियर्सनं हे आव्हान एकही विकेट न गमावता ५ ओव्हरमध्येच पूर्ण केलं.
मागच्यावर्षी सुरु झालेली टी-१० सुपर लीग क्रिकेटमधला नवा फॉरमॅट आहे. या स्पर्धेत दोन्ही टीममध्ये १०-१० ओव्हरची मॅच होते. ही मॅच फक्त दीड तास चालते. मागच्यावर्षी शारजाहमध्ये ६ टीममध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. दुसऱ्या वर्षी टी-१० लीगमध्ये ८ टीम सहभागी झाल्या आहेत. आयोजकांनी यावर्षी स्पर्धेत भाग घेतलेल्या टीमची फी ४,००,००० डॉलरऐवजी १.२ मिलियन डॉलर केली होती.
टी-१० क्रिकेट लीगच्या दुसऱ्या मोसमात नॉर्थन वॉरियर्सचं टायटल स्पॉन्सर ZEE5 आहे. यावर्षी टी-१० क्रिकेट लीगमध्ये नव्यानं सामील झालेल्या ३ टीमपैकी नॉर्थन वॉरियर्स ही एक टीम आहे. ZEE5 झी एन्टरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा एक ग्लोबल डिजीटल एन्टरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे. काही कालावधीपूर्वी ZEE5 १९० पेक्षा जास्त देशांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.