मुंबई : सचिन तेंडुलकरने २०१० साली वनडे क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक करण्याचा विक्रम केला होता. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियरच्या मैदानात १४७ बॉलमध्ये २०० रनची खेळी करून इतिहास घडवला होता. आपल्या या ऐतिहासिक खेळीत सचिनने २५ फोर आणि ३ सिक्स लगावले होते. १० वर्षानंतर आता डेल स्टेनने सचिनच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन तेंडुलकर १९० रनवरच आऊट झाला होता, पण भारतीय चाहत्यांना घाबरून अंपायरनी सचिनला आऊट दिलं नाही, असा दावा स्टेनने केला आहे.
स्टेनने इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनसोबत केलेल्या चर्चेत हा आरोप केला आहे. सचिन १९० रनवर असताना मी टाकलेला बॉल त्याच्या पायाला लागला. यानंतर मी एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. अंपायर इयन गोल्ड यांनी सचिनला आऊट दिलं नाही. याबद्दल मी अंपायरला विचारलं, तेव्हा स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं आहे आणि जर मी सचिला आऊट दिलं तर मला हॉटेलमध्ये परत जाता येणार नाही, असं अंपायरने सांगितल्याचा दावा स्टेनने केला आहे.
भारतामध्ये सचिनला बॉलिंग करणं सगळ्यात कठीण आहे, कारण तुम्ही एखादा खराब बॉल टाकलात तर तो फोर मारतो. सचिन शून्यवर असताना त्याने फोर मारली आणि मॅच मुंबईमध्ये असेल, तर असं वाटतं जगच संपलं आहे. सचिन ४ रनवर नॉटआऊट असला तरी तो ५०० रनवर नॉटआऊट आहे, असं वाटतं, अशी प्रतिक्रिया स्टेनने दिली.