नवी दिल्ली : आधार कार्ड आता तुमचा चेहराही ओळखणार आहे. हे फिचर तुमच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे. UIDAI हे फिचर १ जुलैला लॉन्च करणार आहे. यानंतर तुमचा चेहरा आधार डेटाबेसला जोडण्यात येणार आहे. आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)नं सोमवारी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
आधार कार्डच्या डेटा सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित होत असतानाच UIDAIनं हा निर्णय घेतला आहे. आधारमधली माहिती सार्वजनिक करता येत असल्याच्या बातम्या UIDAIचे माजी डायरेक्टर जनरल आर.एस. शर्मा यांनी फेटाळून लावल्या आहेत.
UIDAI आता फेशियल रेकगनिशन टेस्ट करत आहे. आधारचं हे फिचर १ जुलै २०१८ ला लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना खासकरुन ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑथेंटिकेशनसाठी एक अतिरिक्त लेयर तयार करण्यात येणार आहे. हाताचे ठसे अनेकवेळा येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पण या नव्या फिचरमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
UIDAIचं नवीन फिचर अटी आणि शर्तींसह येणार आहे. फेशियल रेकगनिशनची परवानगी एक किंवा अधिक ऑथेंटिकेशन म्हणजेच फिंगर प्रिंट, ओटीपीसोबत देण्यात येईल. फक्त फेशियल रेकगनिशननं ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
चेहरा ओळखण्याच्या या नव्या फिचरसाठी नागरिकांना आधार केंद्रावर जावं लागणार नाही. UIDAI या फिचरसाठी त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेसचा वापर करणार आहे.