मुंबई : टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. सर्वाचं लक्ष यामध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंकडे लागलं आहे. अशातच भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे.
गेल्या चार दशकांपासून पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघाने अगदी भारतीय नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. हॉकी टीम इंडियाने ग्रुप ए हा सामना जिंकला आहे. बर्याच व्हिडिओ रेफरल्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडला अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारतीय गोलकीपर पीआर श्रीजेशने या पेनाल्टीचं गोलमध्ये रूपांतर होऊ दिलं नाही.
न्यूझीलंडकडून पेनल्टी कॉर्नर स्पेशलिस्ट केन रसेलने सहाव्या मिनिटाला गोल केला. तर लगेच दहाव्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर रुपिंदर पाल सिंहने भारतासाठी गोल करत बरोबरी केला. ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने 26 आणि 33 व्या मिनिटांना गोल केले. शिवाय न्यूझीलंडकडून स्टीफन जेनिसने 43 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. अशा पद्धतीने 3-2 ने भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.
भारताचे केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरद्वारे हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "भारतीय हॉकी संघाने सुरुवात चांगली केली. भारतीय पुरुष संघाने सलामीच्या गटातील सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला.