भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन

कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे.

Updated: May 22, 2021, 07:33 PM IST
भारतीय क्रिकेटपटूच्या आईचं कोरोनामुळे निधन  title=

मुंबई : देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. क्रीडा विश्वातही अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना कोरोनामुळे गमावले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूच्या (Sravanthi Naidu) आईचं आज (22 मे) कोरोनाने निधन झालं आहे. कुटुंबियांच्या विनंतीनंतर प्रकृती अस्थिर असल्यानंतरही त्यांना 21 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्यांनी आज राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. श्रावंतीने आपल्या आईला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र श्रावंतीच्या आईने आज जगाचा निरोप घेतला. (team india former women cricketer Sravanthi Naidu mother passed away due to corona)   

श्रावंतीकडे आईवर उपचारांसाठी खर्च करण्यासाठी पैसै नव्हते. श्रावंतीने आईला वाचवण्यासाठी असलेली सर्व रक्कम उपचारांवर खर्च केली होती. श्रावंतीने बीसीसीआयकडे आईच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली होती. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने आर्थिक मदत केली होती. याआधी श्रावंतीला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि क्रिकेटर हनुमा विहारी यांनीही मदतीचा हात दिला होता. तसेच या खेळाडूंनी इतरांना मदतीचं आवाहन केलं होतं. दरम्यान काही दिवसांआधी भारतीय क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या आईचे कोरोनाने निधन झालं होतं. तर त्याआधी प्रिया पूनियाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  

श्रावंतीची क्रिकेट कारकिर्द 

श्रावंतीने टीम इंडियाचं 4 वनडे आणि 1 कसोटीमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये तिने एकूण 3 विकेट्स घेतल्या आहे. तसेच श्रावंतीने टी 20 क्रिकेटमध्ये 9 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. श्रावंतीने टी 20 मध्ये दणक्यात पदार्पण केलं होतं. श्रावंतीने 2014 मध्ये डेब्यू मॅचमध्ये 9 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या.