लहानपणीच आईचं छत्र हरपलं, बहिणीने मार्ग दाखवला... आज आहे टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या संघर्षाची कहाणी... नक्की वाचा

Updated: Oct 6, 2022, 09:53 PM IST
लहानपणीच आईचं छत्र हरपलं, बहिणीने मार्ग दाखवला... आज आहे टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर title=

Team India : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख बनवली आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रवींद्र जडेजा आज टीम इंडियाचा (Team India) प्रमुख खेळाडू बनला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिनही बाबतीत रवींद्र जडेजा इतर खेळाडूंपेक्षा नेहमीच अव्वल ठरतो. पण हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाही. यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागलाय.

लहानपणी हरपलं आईचं छत्र
रवींद्र जडेजा 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. आपल्या मुलाने खूप मोठं व्हाव, नाव कमाववं अशी त्याच्या आईची इच्छा होती. पण त्याचं हे यश त्याची आई बघू शकली नाही, याची खंत रवींद्र जडेजाला आजही सतावते. 2005 मध्ये त्याची आई लता यांचं एका अपघातात निधन झालं.

आईच्या निधनाचा मोठा आघात रवींद्र जडेजाच्या मनावर झाला. इतका की त्याने क्रिकेट खेळणं बंद केलं. त्याचे वडिल एका प्रायव्हेट कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. घरची आर्थिक परिस्थिती तशी बिकटच होती. पण अशा कठिण काळात त्याची बहिण आपल्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभी राहिली. बहिण नैनाने त्याला धीर दिला आणि पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. बहिणीच्या आग्रहाखातर जडेजाने पुन्हा बॅट हाती धरली. यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. आज त्याच्या यशाचा सर्वाधिक अभिमान आहे तो त्याच्या बहिणीला.

रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त
टीम इंडियाच्या अनेक विजयात रवींद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रवींद्र जडेजा खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पण अनुपस्थिती टीम इंडियाला जाणवतेय हे नक्की.