IPL 2018मध्ये चेन्नई एक्सुप्रेस सुस्साट

आयपीएल २०१८मधील लिलावानंतर सर्वाधिक खेळाडूंची चर्चा झाली ती चेन्नई संघातील.

Updated: May 3, 2018, 04:09 PM IST
IPL 2018मध्ये चेन्नई एक्सुप्रेस सुस्साट title=

मुंबई : आयपीएल २०१८मधील लिलावानंतर सर्वाधिक खेळाडूंची चर्चा झाली ती चेन्नई संघातील. या टीमबाबत त्यावेळी असे म्हटले जायचे की चेन्नईने म्हाताऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवलाय. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर तर या संघाला म्हाताऱ्यांची फौज म्हटले होते. कर्णधार महेंद्रसिंग धोनी असो वा शेन वॉटसन वा ड्वायेन ब्रावो आणि हरभजन सिंग. हे सर्व क्रिकेटर ३५ वा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यामुळे चेन्नईने या वय झालेल्या खेळाडूंना घेऊन चूक केली की काय अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत होत्या. मात्र आयपीएल सुरु झाल्यानंतर संपूर्ण कहाणीच बदलली आहे. 

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये साधारण सगळेच संघ ८-८ सामने खेळलेत. चेन्नईच्या संघाने पुन्हा एकदा सगळ्यांना मागे टाकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. याच वय झालेल्या खेळाडूंनी सगळ्या संघांना सळो की पळो करुन ठेवलेय. या संघाने आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांपैकी केवळ दोन सामन्यांत पराभव स्वीकारलाय. सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये चेन्नईच्या संघातील तीन खेळाडू आहेत. यात अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी आणि शेन वॉटसन यांच्या नावाचा समावेश आहे. 

चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी याबाबत आनंद व्यक्त केलाय.  महेंद्रसिंग धोनी, शेन वॉटसन, ड्वायेन ब्रावो यांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन टीकाकारांची तोंडे बंद केलीत. धोनी आणि वॉटसन लवकरच ३७ वर्षांचे होतील. तर ब्रावो ३५ वर्षांचा आहे. मात्र या तिघांनी चेन्नईच्या आतापर्यंतच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय. धोनीच्या नावावर तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर वॉटसनने एक शतक आणि एक अर्धशतक बनवलेय.