मुंबई : ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 चा थरार रंगत आहे. अनेक सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. भारतीय संघ (Team India) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने फक्त एकच सामना गमावला आहे. त्यामुळे भारतीय चाहते देखील खूश आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात (Australia) सामने सुरु असताना देखील भारतीय चाहते सामने पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
क्रिकेट हा भारतातील सर्वात मोठा खेळ आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा संघाला चांगला पाठिंबा मिळतोय. यजमान ऑस्ट्रेलिया संघाला जितका पाठिंबा मिळाला नाही जितका भारतीय संघाला दुसऱ्या देशात मिळतोय. आतापर्यंत 42 सामन्यांना 590,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. त्यापैकी 282,780 भारताच्या केवळ चार सामन्यांमध्ये होते. भारत-झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात 82,507 प्रेक्षक उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियन संघाच्या सामन्यात देखील ऐवढे प्रेक्षक पोहोचत नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ खराब कामगिरीमुळे उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. 2021 मध्ये भारताने UAE मध्ये आयोजित केलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेतही भारतीय प्रेक्षकांनी मोठी हजेरी लावली होती. एवढेच नाही तर ICC ने 2024-2027 साठी भारतीय बाजारपेठेचे प्रसारण हक्क सुमारे तीन अब्ज डॉलर्सना विकले आहेत.
ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये राहणारे भारतीय केवळ सामना पाहण्यासाठी पोहोचले नाहीत, तर अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जपान, मलेशिया येथे राहणारे भारतीयही लाखो रुपये खर्च करून सामना पाहण्यासाठी येथे आले होते.
कोविडच्या काळात लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेत भारतीयांनी काहीसा हातभार लावला आहे. भारताने उपांत्य फेरी गाठल्यामुळे मेलबर्न ते अॅडलेड विमानाची तिकिटे पाचपट महाग झाली आहेत. ट्रेन आणि बसमध्येही तिकीट मिळत नाही. लोक कार बुक करून अॅडलेडला पोहोचत आहेत. इंग्लंडमध्ये 2019 च्या विश्वचषकात यजमानांच्या अंतिम फेरीत पोहोचूनही भारतीयांनी 70 टक्के सामन्यांची तिकिटे खरेदी केली होती. भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. यानंतर न्यूझीलंडचे चाहते लॉर्ड्सच्या आसपास भारतीयांना तिकीट देण्याची विनंती करताना दिसले. एकूणच, जागतिक क्रिकेट केवळ बीसीसीआय आणि टीम इंडियाच नव्हे तर भारतीय चाहतेही चालवत आहेत.
भारत-पाकिस्तान, MCG, 90,293
भारत-नेदरलँड, सिडनी, 36,426
भारत-दक्षिण आफ्रिका, पर्थ, 44,252
भारत-बांगलादेश, अॅडलेड, 29,302
भारत-झिम्बाब्वे, MCG, 82,507
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, SCG, 34,756
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका, पर्थ, 25,061
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, MCG, 37,566
ऑस्ट्रेलिया-आयर्लंड, GABA, घोषित नाही
ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान, अॅडलेड, 18,672