मुंबई : मिस्टर IPL म्हणजेच सुरेश रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर कोणत्याही टीमने बोली लावली नाही. चेन्नई सुपर किंग्जही आपल्यावर बोली लावणार नाही याचा रैनाने स्वप्नातही विचार केला नसेल. मात्र आता ट्विटमुळे सुरेश रैना आयपीएलच्या एका टीममध्ये सामील होणार असल्याची अटकळ बांधण्यात येतेय.
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टाइटंसच्या टीममध्ये सुरैश रैनाची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय. यासंदर्भातील एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. इंग्लंडच्या जेसन रॉयने आयपीएलमधून त्याचं नाव काढून घेतल्याने आता सुरेश रैनाला गुजरात टायटंसमध्ये एंट्री मिळू शकते असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
गुजरात संघाचा ओपनर जेसन रॉय याला 2 कोटी रुपयांनी संघात समाविष्ट करून घेतलं होतं. जेसन रॉयने गुजरात संघ सोडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या गुजरात संघाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान सुरेश रैनाची आयपीएलमधील कामगिरी ही चांगली राहिली आहे. मागच्या सीजनमध्ये तो काही खास कमागिरी करु शकला नाही. 2 कोटी बेस प्राईज असलेल्या रैनावर यंदा कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे सुरेश रैना पुढे काय करणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय. यापूर्वी अशी चर्चा झाली होती की, तो आयपीएलमधील संघ RCB सोबत जोडला जाऊ शकतो. पण तो कोणत्या भूमिकेत असेल याबाबत स्पष्टता नव्हती.