SL vs IND: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून शनिवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने 43 रन्सने श्रीलंकेचा त्याच्याच घरात पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यशस्वी जयस्वालनंतर कर्णधारपदी पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने उत्तम खेळी करत अर्धशतक ठोकलं.
दरम्यान सूर्यकुमार यादवने डावात अवघे 22 चेंडू खेळून अर्धशतक पूर्ण केलं. टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेचे गोलंदाज ढेर झाले होते. मात्र अशा स्थितीत स्पिनर गोलंदाज कामिंडू मेंडिसने असं काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारताच्या पहिल्या T20 सामन्यात कामिंडू दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना दिसला होता.
जेव्हा सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत भारतासाठी फलंदाजी करत होते, तेव्हा कामिंडूने सूर्यकुमार यादवला त्याच्या डाव्या हाताने गोलंदाजी केली. ज्यामुळे डाव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगला अँगल तयार झाला. मात्र ऋषभ पंत स्ट्राईकवर आल्यावर कामिंडूने उजव्या हाताने त्याला गोलंदाजी केली. या काळात काही काळ पंत आणि सूर्यकुमार यादवही कामिंडू काय करू पाहतोय हे समजलं नाही. मात्र, कामिंडूला डावात फक्त 1 ओव्हर टाकली ज्यामध्ये त्याने 9 रन्स दिले. मात्र यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 213 रन्सचा मोठा स्कोर उभारला होता. टीम इंडियाने ज्या पद्धतीने खेळाला सुरुवात केली होती, त्यावरून किमान धावसंख्या 250 रन्सचा टप्पा पार करेल असं वाटत होते, मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला 213 रन्सवर रोखलं. कर्णधार सूर्यकुमारने भारताकडून सर्वाधिक खेळी खेळली, त्याने 26 चेंडूत 58 रन्स केले. याशिवाय ऋषभ पंतने 33 चेंडूत 49 रन्सचं योगदान दिलं. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने 40 आणि शुभमन गिलने 34 रन्स केले.
या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचं लक्ष्य होतं. परंतु श्रीलंकेची संपूर्ण टीम 19.2 ओव्हर्समध्ये 170 धावांपर्यंत मजल मारू शकली. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या टीमने 14 षटकांत 2 बाद 140 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका सामना जिंकू शकेल असं वाटत होतं. मात्र भारताच्या गोलंदाजांनीही कमबॅक केलं आणि भारताला विजय मिळवून दिला.