कोचीन : फिक्सिंगच्या आरोपानंतर टीम इंडियाचा एकेकाळचा बॉलर एस. श्रीसंत याच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं दाखल केलेल्या एका याचिकेवर केरळ हायकोर्टानं निकाल देत श्रीसंतवर लावण्यात आलेला आजीवन बंदीचा निर्णय कायम ठेवलाय.
महत्त्वाचं म्हणजे, यापूर्वी केरळ हायकोर्टाच्याच एक सदस्यीय बेंचनं श्रीसंतला दिलासा दिला होता. ७ ऑगस्ट २०१७ रोजी या प्रकरणात कोर्टानं आपला निर्णय सुनावत भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड श्रीसंतवर लावण्यात आलेला बंदीचा निर्णय योग्य ठरविण्यात अशस्वी ठरल्याचं म्हटलं होतं. सुनावणी दरम्यान कोर्टानं बोर्डाला फटकारलंही होतं. बोर्डानं कारवाई करताना सर्व पुराव्यांवर योग्य लक्ष दिलं नसल्याचं कोर्टाचं म्हणणं होतं. यानंतर श्रीसंतवर लावण्यात आलेला आजीवन बंदीचा निर्णय निकालात निघेल असं वाटत असतानाच बीसीसीआयनं एक सदस्यीय बेंचच्या या निर्णयाला आव्हान दिलं.
एस. श्रीसंतवर लावण्यात आलेला बंदीचा निर्णय त्याच्याविरुद्ध असलेल्या सबळ पुराव्यांवरून घेण्यात आलेला आहे, असं बोर्डानं अपील करताना म्हटलं.
दुसरीकडे, आपल्याविरुद्ध रचलेला हा डाव आहे... आपण या प्रकरणात निर्दोष आहोत... आणि बोर्डानं आपल्यावरची बंदी हटवावी, असं श्रीसंतचं म्हणणं आहे.