इरफान खानच्या निधनाने क्रीडा विश्वही हळहळलं

 दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे.

Updated: Apr 29, 2020, 03:54 PM IST
इरफान खानच्या निधनाने क्रीडा विश्वही हळहळलं title=

मुंबई : दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे. बुधवारी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये इरफानने शेवटचा श्वास घेतला. मागच्या एका वर्षापासून इरफानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाला होता. इरफान ५३ वर्षांचा होता. दिग्दर्शक शूजित सरकारने सगळ्यात आधी ट्विट करुन इरफान खानच्या निधनाची दु:खद माहिती दिली. 

इरफान खानच्या निधनाची बातमी कळताच क्रीडा विश्वही हळहळलं. क्रिकेटपटूंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून इरफान खानच्या आठवणींना उजाळा दिला. सचिन तेंडुलकरने इरफानला श्रद्धांजली वाहिली. 'इरफानच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:खी आहे. तो माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक होता. इरफानचे बहुतेक चित्रपट मी बघितले आहेत. इरफानचा शेवटचा चित्रपट अंग्रेजी मीडियमही मी बघितला. त्याचा अभिनय शानदार होता. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्याच्या जवळच्यांच्या दु:खात मी सहभागी आहे,' असं सचिन म्हणाला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही इरफानच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. 'इरफानच्या निधनाची बातमी ऐकून दु:खी आहे. इरफान उत्कृष्ट अभिनेता होता. आपल्या अभिनयाच्या कौशल्याने त्याने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो,' असं ट्विट विराटने केलं.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी लिहिलं, 'इरफान खानच्या अचानक मृत्यूमुळे दु:खी आहे. या कठीण काळात ही आणखी दु:खद घटना आहे. भारताने हे सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. इरफानच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे.'

स्वत: कॅन्सरशी झुंजलेल्या युवराज सिंगनेही इरफानला श्रद्धांजली वाहिली. 'मी इरफानचा हा प्रवास समजू शकतो. मला या त्रासाची जाणीव आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तो लढला, हे मला माहिती आहे. काही नशीबवान लोकं ही लढाई जिंकतात, तर काहींचा पराभव होतो. इरफान खान आता एका चांगल्या जगात असेल,' असं युवराज म्हणाला.

भारताचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मानेही इरफानच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली. 'इरफानच्या आत्म्याला शांती मिळो. एक शानदार कलाकार. इरफानने इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख आणि आपलं नशीब स्वत: तयार केलं. देव त्याच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्याची ताकद देवो,' असं ट्विट रोहितने केलं.