Sanju Samson: यंदाच्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. एलिमिनेटर राऊंडमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा 4 विकेट्सने पराभव केला. यामुळे आरसीबीचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर 24 मे रोजी दुसऱ्या क्वालिफायरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान या विजयाने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन फार खूश दिसून आला. सामन्यानंतर संजू काय म्हणाला ते पाहुया...
एलिमिनेटरच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने गोलंदाजांच्या दमदार प्रयत्नांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आठ विकेट्स गमवत केवळ 172 रन्स करता आले. यानंतर 19 ओव्हर्समध्येच राजस्थानच्या टीमने सहा विकेट्स गमावून 174 रन्स करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान पक्कं केलं.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅमसन सामन्यानंतर म्हणाला, 'कधी वाईट दिवस येतील तर कधी चांगले दिवस. पण विजयाच्या लयीत परतणं महत्त्वाचे आहे. गेल्या चार-पाच सामन्यांमध्ये आमची लय योग्य नव्हती. मात्र, यावेळी आम्ही ज्याप्रकारे सामना खेळला आणि आम्ही जशी प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे मी खूप खूश आहे. या विजयाचं श्रेय खेळाडूंना जाते.
संजूने राजस्थान टीमच्या युवा फलंदाजांचेही खूप कौतुक केले. तो म्हणाला, 'अनेक खेलाडू 22 वर्षांची आहेत. या खेळाडूंचा अनुभव या स्तरावर ज्या प्रकारे कामगिरी करतोय ते आश्चर्यकारक आहे. दुसरीकडे खरं सांगायचं तर मी 100 टक्के फिट नाहीये. ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी आजार आहे. बऱ्याच लोकांना खोकला आहे आणि काही लोकं आजारी आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला, 'दव येत असल्याने आम्हाला वाटलं की आम्ही कमी रन्स केले आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी आम्हाला आणखी रन्स हवे होते. जर तुम्ही नैसर्गिकरित्या मूल्यांकन केले तर ही खेळपट्टी 180 सारखी दिसत होती, परंतु आम्हाला माहित होतं की, या सिझनमध्ये अतिरिक्त फलंदाज आणि दीर्घ लाइन-अपसह आव्हानात्मक असू शकतं. सलग सहा गेम जिंकून आम्ही इथे पोहोचलो, पण आजची रात्र आमची नव्हती. यावेळी मी चाहत्यांचेही आभार मानतो.