Ind vs SL: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये टी-20 सिरीज झाल्यानंतर आता वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिला वनडे सामना टाय झाला आणि दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 32 रन्सने पराभव केला. पण आता या वनडे सिरीजबाबत मोठा घोटाळा समोर आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. आता प्रश्न असा आहे की, पहिला वनडे सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही? श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने धक्कादायक विधान केले आहे. ज्यात त्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पहिल्या वनडे सामन्यातही सुपर ओव्हर व्हायला हवी होती पण तसं झालं नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 230 रन्स केले होते. यावेळी टीम इंडियाने प्रत्युत्तरात केवळ 230 रन्स केले. यामुळे पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला. यामधील मोठी गोष्ट म्हणजे आयसीसीच्या नियमांनुसार, सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर व्हायला हवी होती पण आयसीसी मॅच रेफरी रंजन मदुगले यांनी तसं केलं नाही.
इतकंच नाही तर मैदानावरील अंपायर आणि थर्ड-फोर्थ अंपायरवरही याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. वनडे सामन्यातील सुपर ओव्हरचा नियम या अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सुपर ओव्हर न घेण्याचा निर्णय मैदानावरील पंच जोएल विल्सन आणि रवींद्र विमलसिरी यांचा होता. टाय झालेल्या वनडे सामन्याच्या नियमांनुसार, दोन्ही डाव पूर्ण झाल्यानंतर टीमची धावसंख्या समान असल्यास, एक सुपर ओव्हर खेळली जाईल. सुपर ओव्हर टाय झाल्यास, विजेत्याचा निर्णय होईपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाणार आहे. सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर पूर्ण करणं शक्य नसल्यास सामना टाय होईल.
दरम्यान या बाबत आयसीसी किंवा भारतीय मॅनेजमेंटच्या कोणत्याही सदस्याने अजून यावर काहीही भाष्य केलेलं नाही.