मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यपाल सी विद्यासागर राव यांची राजभवन इथं जाऊन भेट घेतली. महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी सचिननं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी झी २४ तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आणि एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृण्मय मुखर्जी हेदेखील उपस्थित होते. सचिननं यापूर्वी शाळांमध्येही शारीरिक शिक्षणाचा तास सुरु करावा यासाठी प्रयत्न केले होते.
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सचिनच्या या मागणीवर विचार सुरु असल्याचं सांगितलं होतं. या मुद्द्यावर सचिननं राज्यसभेतही मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र खासदारांना घातलेल्या गोंधळामुळे त्याला आपला हा मुद्दा काही संसदेत मांडता आला नव्हता. यानंतर सचिननं आपलं भाषण यु-ट्यूबवर अपलोड केलं होतं.