मुंबई : रमाकांत आचरेकरांच्या तालमीमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन उत्तम क्रिकेटर्स घडले.
सचिनपेक्षा अव्वल दर्जाचा असूनही विनोद कांबळी क्रिकेट क्षेत्रामध्ये फार काळ टिकू शकला नाही.
सुमारे ८ वर्षांपूर्वी एका रिएलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर विनोद कांबळीने सचिन तेंडुलकरने अपेक्षित मदत केली नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे सचिन आणि विनोदच्या मैत्रीमध्ये दुरावा आला होता. एकमेकांपासून दूर गेलेले सचिन आणि विनोद नुकतेच एका कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते.
राजदीप सरदेसाईच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोघांनी हजेरी लावली होती. ' आम्हां दोघांमधील वाद आता संपले आहेत. आमच्यातील मैत्रीचं पर्व सुरू झाले आहे. ' अशी कबुली विनोदने दिली आहे.
Backstage at the launch of @sardesairajdeep book wt the author, the master @sachin_rt @vinodkambli349 n @shishhattangadi
pic.twitter.com/u5wFoC6hbJ— atul kasbekar (@atulkasbekar) October 23, 2017
अतुल कसबेकरने शेअर केलेल्या फोटोमध्येही सचिन आणि विनोद एकत्र दिसले आहेत.
का आला होता सचिन विनोदामध्ये दुरावा ?
'सच का सामना' या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर 'माझ्या वाईट काळामध्ये सचिन मला अपेक्षेपेक्षा अधिक मदत करू शकला असता. कदाचित मी चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बचावलो असतो. करिअरमधल्या वाईट काळात मला योग्य प्रेरणादायी व्यक्ती मिळाली असती तर कदाचित माझं क्रिक्रेट करिअर अजून अधिक वेळ चाललं असतं. ' असं विनोद म्हणाला.
रिअॅलिटी शोप्रमाणेच एका इंटरव्ह्यूमध्येही सचिनबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणं विनोदने टाळलं होते. त्यानंतर सचिनने निवृत्तीच्या भाषणावेळेस विनोदचा उल्लेख टाळला. तसेच सचिनवर आधारित डॉक्युमेट्रीमध्ये विनोदचा उल्लेख टाळला आहे.