रणजी ट्रॉफी : ३५/३ वरून ३५ रनवर ऑल आऊट, मध्य प्रदेशचं नकोसं रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीच्या या मोसमामध्ये नकोश्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Updated: Jan 9, 2019, 08:40 PM IST
रणजी ट्रॉफी : ३५/३ वरून ३५ रनवर ऑल आऊट, मध्य प्रदेशचं नकोसं रेकॉर्ड title=

इंदूर : रणजी ट्रॉफीच्या या मोसमामध्ये नकोश्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशची टीम रणजी ट्रॉफी २०१८-१९ मोसमाच्या शेवटच्या राऊंडमध्ये फक्त ३५ रनवर ऑल आऊट झाली. आंध्र प्रदेशविरुद्धच्या या मॅचमध्ये मध्य प्रदेशला विजयासाठी ३४३ रनची आवश्यकता होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. मध्य प्रदेशच्या शेवटच्या ६ विकेट फक्त २३ बॉलमध्येच गेल्या.

दोनच दिवसांपूर्वी त्रिपुराची टीम राजस्थानविरुद्ध ३५ रनवरच ऑल आऊट झाली होती. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात ३५ रन हा १३वा सगळ्यात कमी स्कोअर आहे. तर मध्य प्रदेशच्या टीमचा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातला हा सगळ्यात कमी स्कोअर आहे.

मध्य प्रदेशला एलीट ग्रुप बी मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये १०० रनचा आकडाही गाठता आला नाही. पहिल्या इनिंगमध्ये मध्य प्रदेशची टीम ९१ रनवर ऑल आऊट झाली. आंध्र प्रदेशनं पहिल्या इनिंगमध्ये १३२ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३०१ रन केले. त्यामुळे मध्य प्रदेशला या मॅचमध्ये ३०७ रननी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मध्य प्रदेश रणजी ट्रॉफीच्या नॉक आऊटमधून बाहेर गेली आहे.

इंदूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या मॅचच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात आंध्रच्या बॅटिंगनं झाली. आंध्रनं दुसऱ्या इनिंगमध्ये १९८/७ या स्कोअरपासून सुरुवात केली. लवकरच आंध्रची टीम ऑल आऊट होईल, असं वाटत होतं पण आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या करण शिंदेनं १०३ रनची नाबाद खेळी करून आंध्रला ३०० च्यावर पोहोचवलं.

मध्य प्रदेशला विजयासाठी ३४३ रनचं आव्हान मिळालं. मध्य प्रदेशची अवस्था एकवेळ ३५/३ अशी होती. पण स्कोअरबोर्डवर एकही रन न करता मध्य प्रदेशच्या उरलेल्या ७ विकेट पडल्या. मध्य प्रदेशची पूर्ण टीम १६.५ ओव्हरमध्ये ऑल आऊट झाली. के.व्ही. शशिकांत यानं ८ ओव्हरमध्ये १६ रन देऊन ६ विकेट घेतल्या. तर डीपी विजयकुमारला ८.५ ओव्हरमध्ये १७ रन देऊन ३ विकेट घेण्यात यश आलं. दोन दिवसांपूर्वी त्रिपुराची टीमही ३५ रनवर ऑल आऊट झाली होती. तेव्हा त्यांना १८.५ ओव्हर बॅटिंग करता आली होती.