मुंबई : टी20 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघाला (Indian Cricket Team) नवा प्रशिक्षक मिळणार असून भारताचा माजी क्रिकेटपटू 'द वॉल' राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव मुख्य प्रशिक्षकासाठी निश्चित मानलं जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविडने अधिकृत अर्ज केला आहे. मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत राहुल द्रविड व्यतिरिक्त मोठ्या नावाची चर्चा नाहीए, शिवाय बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शाह यांचीही द्रविडला पसंती आहे.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड इच्छूक नव्हता, पण बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Saurabh Ganguly) राहुल द्रविडशी चर्चा करत त्याचं मन वळवलं. राहुल द्रविड भारतीय संघाबरोबर श्रीलंका दौऱ्यावर (Shri Lanka Tour) गेला होता. या दौऱ्या त्याने मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने श्रीलंकेवर एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला होता.
टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकेपासूनच राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होण्याची शक्यता आहे. राहुल द्रविडने भारताच्या ज्युनिअर संघासाठी अनेक वर्ष प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाने अंडर 19 विश्वचषकही जिंकला होता.
राहुल द्रविडबरोबरच भारताचा माजी गोलंदाज पारस म्हांब्रेचं (Paras Mhambrey) नावही चर्चेत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रेने अर्ज केला आहे. पारस म्हांब्रे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीशी जोडला गेला आहे, तसंच तो राहुल द्रविडच्या विश्वासातला आहे.
सध्या भारतीय टीममध्ये असणाऱ्या मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यानंतर 19 वर्षाखालील गोलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता आहे, आणि हे सर्व गोलंदाज पारस म्हांब्रेच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. पारस म्हांब्रेबरोबरच फिल्डिंग प्रशिक्षकपदासाठी अभय शर्मा यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.