तुला एवढा राग का येतो? व्हायरल गोल्ड मेडलिस्टला मोदींनी विचारल्यावर म्हणाला...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक आणि अभिनंदन केले.

पुजा पवार | Updated: Sep 13, 2024, 02:33 PM IST
तुला एवढा राग का येतो? व्हायरल गोल्ड मेडलिस्टला मोदींनी विचारल्यावर म्हणाला... title=
( Photo Credit : Social Media )

PM Modi on Navdeep Singh: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून 29 पदक जिंकली. ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश होता. पॅरालिम्पिक पदकांच्या क्रमवारीत भारताने 18 व्या क्रमांकाचे स्थान पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची गुरुवारी भेट घेतली. पॅरालिम्पिकमध्ये कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीप सिंह याने दमदार परफॉर्मन्स देत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ही मोठी कामगिरी केल्यावर त्याने भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीप्रमाणे अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नवदीपच्या याच स्वभावाबद्दल मोदींनी त्याला प्रश्न विचारत फिरकी घेतली. 

नवदीपने मोदींना घातली कॅप :

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेला कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीप सिंहने मोदींना कॅप (टोपी) घालण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी मोदींनी नवदीपच्या इच्छेखातर त्या कॅपचा स्वीकार केला. पंतप्रधान मोदी नवदीपकडून कॅप घालून घेण्यासाठी जमिनीवर बसले. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोदींनी नवदीपला म्हटले की, 'तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला का? सगळेच घाबरायला लागले आहेत'. त्याचे बोलणे ऐकून नवदीप हसला, मग तो म्हणाला की 'मला तुम्हाला टोपी घालायची आहे'. ही विनंती करताच पीएम मोदींनी जमिनीवर बसून नवदीपकडून टोपी घालून घेतली. मग मोदी म्हणाले, 'आता बघ तू माझ्यापेक्षा मोठा झाला आहेस'.

मोदींनी घेतली नवदीपची फिरकी : 

पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकच्या फायनल राउंडमध्ये नवदीप सिंहने 46.32 मीटर भाला फेकला. नवदीपने हा थ्रो केल्यावर त्याने अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले. त्याने दूर भाला फेकल्यावर उड्या मारल्या यावेळी त्याच्या तोंडून शिवी सुद्धा निघाली. नवदीपचं हे सेलिब्रेशन पाहून सर्वांना विराट कोहलीची आठवण झाली. नवदीपचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओ संदर्भातच मोदींनी नवदीपची फिरकी घेतली. मोदी म्हणाले की, 'भालाफेकल्यावर तुला एवढा राग का येतो?' तेव्हा नवदीप म्हणाला, 'सर गेल्यावेळेस माझा चौथा क्रमांक आला होता त्यामुळे पदक मिळवण्यापासून चुकलो, पण आता ते मिळवलं याचा आनंद होता. तुम्हाला सुद्धा वचन देऊन गेलो होतो आणि ते पूर्ण केलं'. आता बाकी लोक काय म्हणतात असं मोदींनी विचारल्यावर तो म्हणाला, 'सर्व चांगलंच बोलतायत. देशाचं नाव मोठं केलं म्हणून'. 

हेही वाचा : 91 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एकही बॉल न खेळता मॅच रद्द, भारतीय क्रिकेटवर कलंक

 

कोण आहे नवदीप सिंह?  

नवदीप सिंह हा 24 वर्षांचा असून त्याच्या हाईटमुळे त्याला अनेकजण चिडवायचे. नवदीप हा हरियाणाचा असून तो जाट तोमर कुटुंबातून येतो. त्याचे वडील शेतकरी असून त्यांची दुधाची डेअरी सुद्धा आहेत. नवदीप सिंहची उंची केवळ 4 फूट 4 इंच असल्याने सर्वजण त्याला चिडवायचे. नवदीपचे वडील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू होते. जेव्हा नवदीप 2 वर्षांचा झाला तेव्हा कळले की त्यांच्या मुलाची उंची वाढू शकत नाही. पण त्यांनी आपल्या मुलाला साथ दिली आणि नवदीपला लहानपणापासूनच ॲथलेटिक्सची आवड असल्याने त्याने भालाफेकीत करिअर करण्याचे निश्चित केले. नवदीपने 2017 मध्ये आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच त्याने 2021 मध्ये वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण तर 2024 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पदकाची कमाई केली.