PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Updated: Mar 28, 2022, 02:42 PM IST
PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला... title=

मुंबई : आयपीएलमधील तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध बंगळुरू होता. डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. 15 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पंजाब संघाने बल्ले बल्ले करत बंगळुरूला धूळ चारली. बंगळुरू संघाने तगडं आव्हान समोर ठेवूनही पंजाबने विजय आपल्याकडे खेचून आणला. 

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचं लक्ष्य बंगळुरू संघाने ठेवलं होतं. फाफ ड्यु प्लेसीसचं शतक हुकलं. विराट कोहली 9 धावांसाठी अर्धशतकापासून दूर होता. दिनेश कार्तिकने 32 धावा केल्या. बंगळुरू संघाने 2 गडी गमावून 205 धावांचं लक्ष्य पंजाबसमोर ठेवलं.

पंजाब संघाने 5 गडी गमावून 208 धावा करत बंगळुरू संघाला धूळ चारली आणि सामन्यात विजय मिळवला. बंगळुरूचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसीसने कुठे कमी पडलो आणि का पराभव झाला यामागचं कारण सांगितलं आहे. 

काय म्हणाला कर्णधार फाफ

'मला वाटतं की बॅटिंगच्या बाजूने आम्ही खूप चांगली कामगिरी केली. मात्र शेवटची कॅच सोडली तिथे आमची चूक झाली. ती एक कॅच संघाला खूप महागात पडली.  ओडियन स्मिथने 1 रन काढला होता तेव्हा ती कॅच सुटली. त्यानंतर त्याने 8 बॉलमध्ये 25 धावा केल्या. ती एक चूक बंगळुरूसाठी खूप महागात पडली.' 

'स्टेडियमवर थोडा दव होता. त्यामुळे गोलंदाजीमध्ये देखील अडचणी येत होत्या. दवामुळे भिजलेल्या बॉलवरही त्यांनी तुफान बॅटिंग केली. त्यामुळे त्यांना दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणं अधिक सोपं झालं.' 

पुढे फाफ म्हणाला की, पंजाब संघाच्या फलंदाजांची पावर प्लेमधील खेळी खूप चांगली होती. आम्ही दुसऱ्या टप्प्यात चांगलं यश मिळवलं होतं. विजय निश्चित असं वाटत होतं. मात्र ओडियन स्मिथने आमच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. त्याची एक कॅच सोडल्यानंतर त्याने धावांचा पाऊस पाडला. जो अनपेक्षित होता त्यामुळेच बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचं फाफने म्हटलं आहे.