पाकिस्तानच्या यासिर शाहचा विश्वविक्रम, ८२ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सध्या युएईमध्ये टेस्ट सीरिज सुरु आहे.

Updated: Dec 6, 2018, 06:54 PM IST
पाकिस्तानच्या यासिर शाहचा विश्वविक्रम, ८२ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं title=

अबुधाबी : पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सध्या युएईमध्ये टेस्ट सीरिज सुरु आहे. या सीरिजच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाहनं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. यासिर शाहनं टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २०० विकेट पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

या मॅचआधी यासिर शाहच्या नावावर ३२ टेस्टमध्ये १९५ विकेट होत्या. त्यानं न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये ३ विकेट घेतल्या होत्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट घेऊन त्यानं २०० विकेटचा टप्पा गाठला. ३२ वर्षांच्या यासिर शाहनं त्याच्या ३३व्या टेस्टमध्ये २०० विकेटचा पल्ला गाठला. याचबरोबर त्यानं ऑस्ट्रेलियाच्या सीवी ग्रिमेट यांचं ८२ वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं. ग्रिमेट यांनी ३६ टेस्ट मॅचमध्ये २०० विकेटचा विक्रम केला होता.

सर्वात जलद २०० विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विननं ३७व्या टेस्ट मॅचमध्ये २०० विकेटचा टप्पा गाठला होता.

सर्वात जलद १०० विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यासिर शाह दुसऱ्या क्रमांकावर होता. १७ टेस्ट मॅचमध्ये यासिर शाहनं १०० विकेट घेतल्या होत्या. १७ टेस्ट मॅचमध्ये १०० विकेट घेणारे ४ बॉलर आहेत. तसंच ९ टेस्टमध्येच यासिर शाहनं ५० विकेट घेतल्या होत्या. सगळ्यात जलद ५० विकेट घेणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे.