काश्मीरवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो...

पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदनेही काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे.

Updated: Aug 13, 2019, 09:53 PM IST
काश्मीरवर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज म्हणतो... title=

कराची : पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमदनेही काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे. 'संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या आमच्या बंधूंसोबत आहे. या कठीण काळात अल्लाहने काश्मिरींचा बचाव करावा, अशी प्रार्थना मी करतो,' असं सरफराज बकरी ईदच्या नमाजनंतर म्हणाला. काश्मिरी जनतेएवढचं दु:ख आणि यातना आम्हालाही झाल्या आहेत. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.

याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही काश्मीरच्या मुद्द्यावरून बरळला होता. 'संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,' असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं. आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं.

भारतीय संसदेने जम्मू काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि अनुच्छेद ३५ ए रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचं विभाजन केलं.  जम्मू-काश्मीरला विधानसभा सहित केंद्रशासित प्रदेश आणि लडाखला विधानसभा विरहित केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. पाकिस्तानने भारतासोबत असलेले सगळे संबंध तोडले. तसंच जागतिक पातळीवरही हा मुद्दा घेऊन जायचा प्रयत्न केला, पण कोणत्याच देशाने पाकिस्तानला या मुद्द्यावरून साथ दिली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली.