Vinesh Phogat Yiu Susaki Match : भारतीय कुस्तीपटूंसाठी ऑलिम्पिकमधील यंदाचं वर्ष काहीसं खास ठरलं. महिलांच्या 50 किलो वजनी गटातून सहभागी झालेल्या विनेश फोगाटची पदकाची शक्यता मावळली असली तरीही विनेशचा एकंदर खेळ आणि तिला मिळालेलं यश पाहता, देशवासियांसाठी तिच खरी पदक विजेती ठरली. इथं विनेशच्या नावाची चर्चा सुरु असताना आणि तिला किमान रौप्य पदक विभागून देण्याच्या प्रयत्नांची शिकस्त सुरू असतानाच अचानकच तिनं नमवलेल्या जपानच्या युई सुसाकी या जागतिक स्तरावरील आघाडीच्या खेळाडूचं एक वक्तव्य संपूर्ण क्रीडाक्षेत्राचं लक्ष वेधून गेलं.
विनेशच्या पदकाच्या आशा जवळपास मावळताना दिसत असतानाच तिनं नमवलेल्या युई सुसाकी या जपानी कुस्तीपटूनं मांडलेली भूमिका अनेकांना हैराण करून जात आहे. कारण, इथं युईचं भावनिक रुप सर्वांसमोर आलं असून, तिनं माफी, विश्वासघात अशा शब्दांचा वापर आपल्या वक्तव्यामध्ये केल्याचं पाहायला मिळालं आहे.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार युईनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. जिथं तिनं लिहिलं, 'मला 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी मिळाली. यासाठी मी सर्वच चाहत्यांचे मनापासून आभार मानते. मला माझे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सर्वांनाच भेटायचं होतं ज्यांनी मागील तीन वर्षांपासून माझ्यासोबत या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळण्यासाठीचा संघर्ष केला. पण, मी असं करु शकले नाही. मला याची प्रचंड खंत वाटतेय, मला माफ करा की मी तुमचा विश्वासघातच केला आहे.'
जगभरातील क्रीडाप्रेमींनी दिलेलं प्रेम, प्रोत्साहनपर शब्द आणि त्यांच्या प्रतिक्रिया या साऱ्यासाठी आपण कृतज्ञ असल्याचं म्हणत पुन्हा एकदा तिनं ऑलिम्पिक चॅम्पियन होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू अशी हमी दिली. 'सुरुवातीचे काही दिवस मी सर्वांनाच उत्तर देऊ शकत नव्हते. पण, मी व्यक्तिश: प्रत्येक मेसेज पाहिला. या सर्व शब्दांनी माझ्या मनाचा प्रत्येक कोपरा व्यापला आणि मला पुढे असंच काम करण्यासाठीची प्रेरणा दिली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी आणि ऑलिम्पिक चॅम्पियन होण्यासाठी मी कसोशीनं प्रयत्न करेन', अशी खात्री तिनं दिली.