Tokyo Olympics - माझी होशील ना! ऑलिम्पिकच्या मैदानात प्रशिक्षकाचं हटके प्रपोज

प्रपोज करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रीडा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीच पडला आहे

Updated: Jul 27, 2021, 10:50 PM IST
Tokyo Olympics - माझी होशील ना! ऑलिम्पिकच्या मैदानात प्रशिक्षकाचं हटके प्रपोज title=

टोकियो : कोणत्याही स्पर्धेत हरणं ही खेळाडूसाठी तशी वाईटच गोष्ट, आणि ही ऑलिम्पिकसारखी मोठी स्पर्धा असेल तर त्या खेळाडूसाठी अधिकच वेदनादायी म्हणावी लागेल. पण सध्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) अशी एक घटना घडली की हरल्यानंतरही या खेळाडूसाठी ही स्पर्धा आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. 

ही खेळाडू आहे अर्जेंटिनाची तलवारपटू मारिया बेलेन मॉरिस. तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली मारिया महिला गटाच्या पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडली. खरं तर मारियासाठी हा वाईट क्षण होता. पण तिच्या प्रशिक्षकांनी अशी गोष्ट केली की तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. 

हंगेरियाच्या एना मार्टनविरुद्धच्या सामन्यात मारियाला 15 - 12 असा पराभव पत्करावा लागला. यानंतर आपल्या स्पर्धेतील कामगिरीविषयी मारिया एका वृतसंस्थेला मुलाखत देत होती. त्याचवेळी तिचे प्रशिक्षक लुकास सॉसेडो हातात एक पेपर घेऊन हळुच तिच्या मागे उभे राहिले. मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने मारियाला मागे वळून बघण्यास सांगितलं आणि मागे बघताच मारियाला सुखद धक्का बसला. 

लुकाने हातात धरलेल्या पेपरवर लिहिलं होतं 'तू माझ्याशी लग्न करशील का?' प्रशिक्षक लुकास सॉसेडोने तिला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. मारियानेही आनंदाने होकार देत लुकासला आलिंगन दिलं. ऑलिम्पिकमध्येच मारियाला प्रपोज करण्याचं ठरवलं होतं, असं लुकास सॉसेडो यांनी म्हटलं. 

मारिया आणि लुकास हे तलवारबाजीमुळे एकमेकांना भेटले. लुकास यांनीही तलवारबाजीत अर्जेंटिनाचे प्रतिनिधीत्व केले होतं. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी मारियाला तलवारबाजीचे धडे दिले. हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले आणि ते एकमेकांना डेट करू लागले. हा व्हिडीओ क्रीडा चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडला आहे.