मॅनचेस्टर : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऍशेस सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ शानदार फॉर्ममध्ये आहे. एकट्याच्या जोरावर स्मिथने ऑस्ट्रेलियाला यंदाच्या ऍशेसमध्ये जिंकवलं आहे. पण स्मिथ कितीही चांगला खेळत असला तरी तो चिटरच राहणार, अशी टीका इंग्लंडचा माजी फास्ट बॉलर स्टीव्ह हार्मिनसनने केली आहे.
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी मागच्या वर्षी स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांचं वर्षभरासाठी आणि कॅमरून बॅन्क्रॉफ्टच ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. पुनरागमन केल्यानंतर स्मिथने ऑस्ट्रेलियाला ऍशेसमध्ये २-१ने आघाडी मिळवून दिली आहे. पण इंग्लंडमधल्या प्रेक्षकांकडून मात्र स्मिथवर जोरदार टीका होत आहे. स्मिथने ऍशेस सीरिजच्या ५ इनिंगमध्ये ६७१ रन केले आहेत.
'स्मिथने दक्षिण आफ्रिकेत जे केलं त्याला तुम्ही विसरू शकत नाही. जेव्हा तुमची ओळख चिटर अशी होते, तेव्हा चांगल्या कामगिरीनंतर नवा मुलामा मी लावणार नाही. स्मिथने काहीही केलं तरी तो चिटर म्हणून लक्षात राहिल. याबद्दल कोणाचं मत बदलणार नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या त्या घटनेमुळे क्रिकेटची प्रतिमा मलिन झाली,' असं हार्मिनसन म्हणाला.
ऍशेसमधल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्मिथने टेस्ट क्रिकेटमध्ये बॅट्समनच्या क्रमवारीत विराटला मागे टाकत पहिला क्रमांक गाठला आहे.