मुंबई : भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर आता तरी वाद संपतील अशी शक्यता होती पण ती देखील फोल ठरली आहे. अनिल कुंबळे सोबतचे वाद बाहेर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. पण आता भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफवरुन देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर रवी शास्त्री यांनी आक्षेप घेतला आहे. रवी शास्त्री गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीबरोबर चर्चा करणार आहेत. रवी शास्त्री यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण हवे आहेत.
भारत अरुण यांच्यासाठी रवी शास्त्री आग्रही आहेत. रवी शास्त्री संघाचे संचालक असताना भारत अरुण हेच गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी संभाळत होते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी आपल्याला सपोर्ट स्टाफ निवडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलं आहे. झहीर खान संघासोबत नको अशीच रवी शास्त्री यांची भूमिका आहे.