मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी

  मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱया महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा. पण याला काही खेळ अपवाद आहेत. यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. 

Prashant Jadhav Updated: Mar 13, 2018, 05:51 PM IST
मुंबई महापौर श्री स्पर्धेला संघटनेचे बळ पालिकेकडून दीड लाखांचा निधी title=

मुंबई :  मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱया महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा. पण याला काही खेळ अपवाद आहेत. यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल. पालिकेकडून दीड लाखांचा निधी मिळाला असतानाही बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन पाच लाखांपेक्षा अधिक आर्थिक बळ या स्पर्धेला लावून मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेची ताकद वाढवली आहे. 

या स्पर्धेत सुमारे दोन लाख रूपयांची रोख बक्षीसेच खेळाडूंना दिली जाणार आहेत. त्यामुळे शरीरसौष्ठव संघटनेप्रमाणे अन्य खेळाच्या संघटनांनी मुंबई महापौर चषक स्पर्धांसाठी आपल्याकडूनही आर्थिक बळ लावून स्पर्धेचा दर्जा  उंचावण्यासाठी पुढाकार घ्यावे, असे आवाहन उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल किर्तीकर यांनी केले.

येत्या शुक्रवारी16 मार्चला अंधेरी पूर्वेला शेर-ए-पंजाब सोसायटीत मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा रंगतेय. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी महापौर निधीतून केवळ दीड लाख रूपये शरीरसौष्ठव संघटनेला दिले जातात. इतक्या कमी रकमेतून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शक्य नसल्याचे संघटनेकडून वारंवार महापालिकेच्या क्रीडा खात्याला कळविण्यात आले. या स्पर्धेच्या निधीत वाढ केली जावी म्हणून संघटनेने अनेकदा प्रयत्न केले, पण त्यांना अपेक्षित यश अद्यापही मिळालेले नाही. तरीही संघटनेने मुंबई महापौर श्री स्पर्धेचा दर्जा अधिक उंचवावा आणि या स्पर्धेला मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू यावेत म्हणून संघटनाच पाच लाखांपेक्षा अधिक निधी या स्पर्धेसाठी खर्च करणार  असून यासाठी अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि  संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रवीण पाटकर यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती बृहन्मुंबई बॉड़ीबिल्डर्स संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. 

महापौर स्पर्धांसाठी मिळणाऱया निधीपेक्षा तिप्पट-चारपट निधी आम्ही शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासाठी खर्च करतो. असा खर्च आमच्या माहितीनूसार दोन-तीन क्रीडा संघटनाच करीत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मि.इंडियाच्या पूर्व तयारीसाठी

येत्या 23 ते 25 मार्चला पुण्याच्या बालेवाडीत होत असलेल्या मि.इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू महाराष्ट्राच्या संघातून मुंबईचेच खेळणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या आठवडाभरापूर्वी होणाऱया या स्पर्धेत मुंबईचे सर्वच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू खेळणार हे निश्चित आहेत. मि.इंडियाची रंगीत तालीम म्हणूनही मुंबईकर खेळाडू या स्पर्धेकडे पाहात आहेत. या स्पर्धेत दोनवेळा भारत श्री ठरलेला सुनीत जाधव, मुंबई श्री सुजन पिळणकर, अक्षय मोगरकर, अतुल आंब्रे, सकिंदर सिंग, सचिन डोंगरे आणि सागर कातुर्डेसारखे अनेक तयारीतले खेळाडू मुंबई महापौर श्री स्पर्धेच्या मंचावर आपले पीळदार स्नायू दाखवण्यास उत्सूक आहेत. त्यामुळे यंदाची मुंबई महापौर श्री रंगतदार होणार यात वाद नाही.

दोन लाखांची रोख बक्षीसे....

मुंबई महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला महापौर निधीतून केवळ दीड लाख रूपये मिळत असले तरी शरीरसौष्ठव संघटनेने सुमारे दोन लाख रूपयांची रोख बक्षीसे ठेवली आहेत. मुंबई महापौर श्री चा विजेत्याला रोख 51 हजार रूपयांच्या पुरस्काराने गौरविले जाणार असून  उपविजेत्याला 21 हजार रूपयांचे रोख इनाम दिले जाईल. त्याचप्रमाणे 7 गटात होणाऱया या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये 5, 4, 3, 2, 1.5 आणि 1 हजारांची सहा बक्षीसे दिली जातील. म्हणजेच एकंदर सात गटात 42 खेळाडूंना रोख इनाम दिले जाणार असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी शरीरसौष्ठवपटूंनी अजय खानविलकर (9769879828) आणि सुनील शेगडे (9223348568) यांच्या संपर्प साधावा, असे आवाहन राजेश सावंत यांनी केले आहे.