पुढच्या वर्षी या खेळाडूंना मुंबई डच्चू देणार?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

Updated: May 21, 2018, 08:59 PM IST
पुढच्या वर्षी या खेळाडूंना मुंबई डच्चू देणार? title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. ग्रुप स्टेजमध्येच मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं. १४ मॅचपैकी ६ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर ८ मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवामुळे मुंबईच्या टीममधले कमजोर दुवे समोर आले आहेत. २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकणारी मुंबई आता २०१९ साली पुन्हा एकदा नव्या जोषात मैदानात उतरण्याची तयारी करेल. पण त्याआधी टीममध्ये काही बदल करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी ज्या खेळाडूंना संधी मिळूनही त्यांची कामगिरी निराशाजनक झाली त्यांना टीममधून डच्चू मिळू शकतो.

कायरन पोलार्ड

मुंबईला ३ आयपीएल जिंकवून देण्यात मोलाचं योगदान देणारा खेळाडू म्हणजे कायरन पोलार्ड. पण यावर्षी पोलार्डची कामगिरी अतिशय खराब झाली. मागच्या वर्षीपर्यंत मुंबईच्या टीमच्या अंतिम ११ मधला ठरलेला खेळाडू म्हणजे पोलार्ड. पण यावर्षी सुरुवातीच्या खराब कामगिरीमुळे रोहित शर्मानं पोलार्डला टीमबाहेर ठेवलं. अखेर पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये पोलार्डला संधी देण्यात आली तेव्हा त्यानं अर्धशतक झळकावलं. आयपीएलच्या लिलावावेळीही मुंबईनं पोलार्डला राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा टीममध्ये घेतलं. पण याचा मुंबईला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी पोलार्डला मुंबईची टीम बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

मुस्तफिजुर रहमान

फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानलाही यावर्षी चमकदार कामगिरी करता आली नाही. सुरुवातीच्या काही मॅच खेळल्यानंतर रोहित शर्मानं मुस्तफिजुरला टीममधून काढून टाकलं. मुस्तफिजुरऐवजी न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलेनघनला रोहितनं संधी दिली. मॅकलेनघननही मग मुंबईला मोक्याचा क्षणी विकेट घेऊन दिल्या, त्यामुळे पुढच्या आयपीएलमध्ये मुस्तफिजुर रहमानला मुंबई डच्चू देऊ शकते. लिलावामध्ये मुंबईनं पॅट कमिन्सला विकत घेतलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएल मुकावं लागलं. पुढच्या वर्षी कमिन्स फिट होऊन आला तर मुंबईची बॉलिंग आणखी धारदार होईल.

अकिला धनंजया 

श्रीलंकेच्या या स्पिनरला मुंबईनं लिलावात विकत घेतलं पण फक्त एकाच मॅचमध्ये त्याला संधी देण्यात आली. या मॅचमध्येही त्यानं निराशाजनक कामगिरी केली. टी-20 क्रिकेटमध्ये स्पिनर नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात. पण मुंबईच्या टीममध्ये एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पिनर नव्हता. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये मयंक मार्कंडेनं चांगली कामगिरी केली. पण दुसऱ्या टीमच्या बॅट्समनना मार्कंडेची बॉलिंग समजल्यावर मात्र त्याला चमक दाखवता आली नाही. शेवटी कृणाल पांड्याच्या स्पिन बॉलिंगवरच मुंबईला या मोसमात खेळावं लागलं. पुढच्या वर्षी कामगिरी सुधारायची असेल तर मुंबईला अकिला धनंजयाऐवजी दुसऱ्या चांगल्या स्पिनरचा शोध घ्यावा लागेल. 

जे.पी. ड्युमिनी 

शेवटच्या क्षणी मुंबईनं दक्षिण आफ्रिकेच्या जे.पी.ड्युमिनीला टीममध्ये घेतलं. पण त्याला टीममध्ये फारशी संधी देण्यात आली नाही. ज्या मॅचमध्ये ड्युमिनीला संधी मिळाली तेव्हा शेवटचे काही बॉल खेळायला मिळाले. मुंबईच्या इतर खेळाडूंच्या तुलनेत ड्युमिनीचा खेळ आक्रमक नाही. त्यामुळे पुढच्या वर्षीही ड्युमिनीला शेवटचे काही बॉलच खेळायला मिळणार असतील तर मुंबई त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूचा विचार करेल.