कबड्डी लिग : कुर्ला किंग्जचा सलग दुसरा विजय

महामुंबई कबड्डी लिगचा दुसरा दिवस गाजवला तो नंदूरबारच्या दादा आवाडने. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कुर्ला किंग्जला सलग दुसरा विजयच मिळवून दिला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 17, 2018, 06:48 PM IST
कबड्डी लिग : कुर्ला किंग्जचा सलग दुसरा विजय title=

मुंबई : महामुंबई कबड्डी लिगचा दुसरा दिवस गाजवला तो नंदूरबारच्या दादा आवाडने. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे कुर्ला किंग्जला सलग दुसरा विजयच मिळवून दिला. तसेच या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. 

डी अॅण्ड डी टायटन्सची कडवी झुंज

जावळी टायगर्सवर मात करत कुर्ला किंग्जने आपला दुसरा सामना ३७-२१ असा दणदणीत विजय मिळवला. तर आज कांदिवली कोब्राजने दोन्ही लढतीत जोरदार विजयांची नोंद केली. त्यांनी अंधेरी आर्मीचा २९-२२ असा पराभव केला. डी अॅण्ड डी टायटन्सची कडवी झुंज ३६-३२ अशी मोडीत काढली. तसेच अन्य एका लढतीत अंधेरी आर्मीने लालबाग लायन्सवर २६-१९ अशी सहज मात केली.

चारकोपच्या सह्याद्री नगरात उभारलेल्या नामदेवराव कदम क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना सलग दुसऱ्या दिवशीही कबड्डीचा वेगवान नजराणा अनुभवता आला. भाजप चारकोप विधानसभा, अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओ.एच. मीडिया हाऊसच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

जावळी टायगर्सचा ३७-२१ असा धुव्वा

पहिल्यावहिल्या महामुंबई कबड्डी लिगच्या दुसऱ्या दिवशी दादा आवाडने चांगली कामगिरी करत दादाने १३ गुण संघाला मिळवून दिलेत. तर एक सुपर कॅच करीत ३ गुण घेतले. दादाच्याच खेळाच्या जोरावर कुर्ला किंग्जने जावळी टायगर्सचा ३७-२१ असा धुव्वा उडवला.

अंधेरी आर्मीने या पराभवानंतर पुनरागमन 

कांदिवली कोब्राजने विजयाचा दुहेरी धमाका करताना रोहित पाष्टेच्या झंझावाती चढायांच्या जोरावर आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला. डी अॅण्ड डी कडून निनाद तावडे, अमीर धुमाळ आणि धीरज ध्वरवळे यांनी चढायांचा वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण किरण कदमने तो प्रयत्न वारंवार हाणून पाडला. त्याने ७ सर्वांगसुंदर पकडी करून आपल्या संघाला विजयासमीप नेऊन ठेवले. 

कांदिवली कोब्राजने आपल्या आजच्याच दुसऱ्या सामन्यात अंधेरी आर्मीला पहिल्या डावातील पिछाडीनंतरही हरवले. मात्र ती आघाडी अवघ्या एका गुणाचीच होती. या लढतीत दोन्ही संघ प्रारंभापासूनच सावधगतीने खेळत होते. अंधेरी आर्मीने या पराभवानंतर पुनरागमन करताना दिवसातील शेवटच्या सामन्यात लालबाग लायन्सवर २६-१९ असा एकतर्फी विजय नोंदवला.