'प्रशिक्षकाच्या भूमिकेविषयी कोहलीनं समजून घेतलं पाहिजे'

अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादावरून भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं विराट कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत.

Updated: Jul 10, 2017, 11:06 PM IST
'प्रशिक्षकाच्या भूमिकेविषयी कोहलीनं समजून घेतलं पाहिजे' title=

मुंबई : अनिल कुंबळेसोबत झालेल्या वादावरून भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं विराट कोहलीला कानपिचक्या दिल्या आहेत. प्रशिक्षकाची भूमिका काय असते हे विराट कोहलीनं समजून घेतलं पाहिजे, असं गांगुली म्हणाला आहे.

सौरव गांगुलीबरोबरच सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये आहेत. टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड ही सल्लागार समितीच करणार आहे. प्रशिक्षकाच्या निवडीसाठी सल्लागार समिती मुंबईमध्ये होती. पण प्रशिक्षकाची निवड ही लांबणीवर पडली आहे.

सल्लागार समितीनं कोच निवडीसाठी आणखी कालावधी मागितलाय. विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर कोचच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोहलीनं कोणाच्याही नावाची शिफारस केली नसल्याचं सौरव गांगुलीनं स्पष्ट केलं आहे.

नवा कोच हा 2019 च्या वर्ल्ड कपर्यंत असेल असंही सौरव गांगुली म्हणाला आहे. रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत कोचच्या रेसमध्ये आहेत. तर खरी चुरस ही रवी शास्त्री आणि सेहवागमध्ये आहे. कोहलीची पसंतची ही शास्त्रींना आहे. मात्र, सल्लागार समितीनं आणखी वेळ मागितल्यानं आता रवि शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की, एखादं नवं नाव पुढे येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.