पगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Updated: Nov 30, 2017, 08:22 PM IST
पगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग title=

मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. खेळाडूंची पगारवाढ आणि विश्रांती या विषयावर भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

धोनी आणि कोहलीबरोबर आमची यशस्वी चर्चा झाली. खेळाडू प्रत्येक वर्षी खेळणाऱ्या मॅच आणि त्यांना देण्यात येणारं मानधन याबाबत चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयचे अधिकारी विनोद राय यांनी दिली आहे.

बीसीसीआयकडून आश्वासन

या दोन्ही खेळाडूंकडून आम्ही योग्य माहिती घेतली आहे आणि भविष्यात यामध्ये बदल करू, असं आश्वासन विनोद राय यांनी दिलं आहे. यामध्ये कसा बदल होईल, ते आत्ता सांगता येणार नसल्याचं विनोद राय म्हणाले.

खेळाडूंना मिळते एवढे मानधन

बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये झालेल्या करारानुसार ग्रेड ए मध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला दोन कोटी रुपये मिळतात. ग्रेड बी मध्ये असलेल्या खेळाडूंना वार्षिक एक कोटी आणि ग्रेड सी मध्ये असलेल्या खेळाडूंना ५० लाख रुपये मिळतात. याशिवाय टेस्टमध्ये पहिल्या ११ खेळाडूंना प्रत्येक मॅचचे १५ लाख रुपये मिळतात. ग्रेड ए खेळाडूंसाठी पाच कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेनं केली होती.