पांड्या-राहुलसाठी 'कॉफी' कडू! दोन वनडेमध्ये निलंबनाचा प्रस्ताव

कॉफी विथ करण या शोमध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 10, 2019, 02:41 PM IST
पांड्या-राहुलसाठी 'कॉफी' कडू! दोन वनडेमध्ये निलंबनाचा प्रस्ताव title=

मुंबई : कॉफी विथ करण या शोमध्ये केलेली वादग्रस्त वक्तव्य हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या दोन्ही खेळाडूंवर २ मॅचच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे. करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये पांड्या आणि राहुलनं महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यामुळे दोघांवर चौफेर टीका होत होती, तसंच कारवाईची मागणीही करण्यात येत होती. विनोद राय यांनी या दोघांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला असला तरी प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुल्जी यांनी मात्र हे प्रकरण बीसीसीआयच्या कायदे विभागात पाठवण्याची मागणी केली आहे.

कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्यानं त्याच्या सेक्स लाईफ बद्दल वादग्रस्त वक्तव्य केली होती. यानंतर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनं पांड्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यानंतर हार्दिक पांड्यानं दिलगिरी व्यक्त केली आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही, असं सांगितलं.

हार्दिक पांड्यानं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आम्ही समाधानी नाही. त्यामुळे मी या दोघांवर २ वनडे मॅचच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवत असल्याचं विनोद राय म्हणाले. पण या दोघांवरची कारवाई डायना एडुल्जींनी हिरवा कंदील दिल्यावरच होईल, अशी प्रतिक्रिया विनोद राय यांनी पीटीआयला दिली.

या वादाबद्दल पांड्यानं दिलगिरी व्यक्त केली असली तरी केएल राहुलनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीसीसीआयनं या दोघांना उत्तर देण्यासाठी २४ तासांचा अवधी दिला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या वनडे सीरिजला १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पांड्या आणि राहुल या वनडे सीरिजसाठी भारतीय टीममध्ये आहेत.

डायना एडुल्जींनी याबद्दल कायदेशीर मत मागितलं आहे. यानंतरच पांड्या आणि राहुलवरच्या कारवाईचा निर्णय होईल. पण या शोमध्ये करण्यात आलेली वक्तव्य अत्यंत खराब आणि खालच्या पातळीची असल्याचं विनोद राय म्हणाले.

डायना एडुल्जी यांनी याप्रकरणी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सीके खन्ना, काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचंही मत मागितलं आहे.

हार्दिक पांड्याची माफी

काय म्हणाला होता हार्दिक पांड्या

करण जोहरच्या या शोमध्ये हार्दिक पांड्यानं त्याच्या सेक्स लाईफवर भाष्य केलं. माझ्या सेक्स लाईफबद्दल माझ्या कुटुंबाला काहीच आक्षेप नसल्याचं हार्दिक पांड्या म्हणाला. कुटुंबासोबत पार्टीला गेलो असताना त्यांनी मला यातल्या कोणत्या मुलीबरोबर 'सिन' केला आहेस, असा प्रश्न विचारला. तेव्हा हिच्याबरोबर, हिच्याबरोबर आणि तिच्याबरोबर, असं उत्तर मी कुटुंबाला दिल्याचं पांड्यानं सांगितलं. असं असलं तरी माझ्या कुटुंबाला माझा अभिमान आहे, असं पांड्या या मुलाखतीमध्ये म्हणाला.

एवढच नाही तर आपण पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर व्हर्जिनिटी गमावल्याचंही कुटुंबाला येऊन सांगितल्याचं वक्तव्य हार्दिक पांड्यानं केलं. 'आज मे कर के आया' हे मी कुटुंबाला पहिल्यांदा सेक्स करून आल्यानंतर सांगितल्याचं हार्दिक म्हणाला.

नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर तू मुलींना त्यांचं नाव का विचारत नाही? असा प्रश्न करण जोहरनं हार्दिकला विचारला. तेव्हा मला मुली कशा नाचतात हे पाहायला आणि निरिक्षण करायला आवडतं, असं उत्तर हार्दिक पांड्यानं दिलं.